Join us

BJP आमदाराच्या गोळीबारानंतर आदित्य ठाकरेंनी गुन्ह्यांची यादीच काढली, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2024 4:59 PM

गेल्या २ वर्षात बनावट आणि खोट्या व्हॉट्सअप मेसेजमुळे अनेक ठिकाणी दंगली उसळल्या असा आरोपही आदित्य ठाकरेंनी केला.

 मुंबई - उल्हासनगर येथे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या पोलीस ठाण्यातच गोळीबार केला. त्यानंतर या घटनेवरून विरोधकांनी सरकारला घेरले आहे. त्यात आता माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर सत्ताधारी आमदारांकडून झालेल्या गुन्ह्यांची यादी काढली आहे. 

आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत म्हटलं की, भाजपा पुरस्कृत खोके सरकारनं महाराष्ट्र हाती घेतल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेबाबत काही उदाहरणे दिसून येतात. 

१)  एक भाजपा आमदार पोलीस ठाण्यात मिंदे टोळीच्या नेत्यावर ५ गोळ्या झाडतो.२) गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत मिंदे टोळीच्या आमदाराने हातात बंदूक घेऊन मुंबईकरांना धमकावले. त्यानंतर पोलीस ठाण्यात त्यांच्या बंदुकीतून गोळी झा़डली. याचा अहवाल सार्वजनिक करण्यात आला नाही. या कृत्याचे बक्षिस म्हणून आता त्यांना एका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बनवलं आहे. ३) मिंदे टोळीच्या आमदाराचा मुलगा मुंबईतील एका व्यावसायिकाचे अपहरण करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. त्यानंतर मुलगा होर्डिंगवर दिसतो परंतु पोलीस कारवाई नाही. ४) मिंदे टोळीच्या आमदाराच्या लोकांनी उत्तर मुंबईतील भाजपा कार्यकर्त्यांना मारहाण केली. त्याठिकाणी २०२२ पर्यंत विरोधी पक्ष असलेले भाजपा नेते पोहचले परंतु तिथेही पोलीस कारवाई झाली नाही. ५) मिंदे टोळीचा नेता त्याच्या मुलासह एका कुटुंबाला आणि मुलीला घरात घुसून मारहाण करतानाचे कॅमेऱ्यात कैद झाले परंतु तिथेही कारवाई नाही. ६) ठाण्यातही या टोळीच्या स्थानिक नेत्यांनी IVF उपचार घेणाऱ्या महिलेला पोटात लाथ मारत मारहाण केली. ही घटनाही कॅमेऱ्यात कैद झाली परंतु पोलीस कारवाई झाली नाही. 

गेल्या २ वर्षात बनावट आणि खोट्या व्हॉट्सअप मेसेजमुळे अनेक ठिकाणी दंगली उसळल्या. गुंड व्यावसायिकांना धमकावत आहेत. दु्र्दैवाने अत्यंत असक्षम आणि बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांमुळे ही महाराष्ट्राची सद्यस्थिती आहे. या गुन्हेगारांच्या राजवटीत नागरिकांना सुरक्षित कसे वाटेल? असा सवालही आदित्य ठाकरेंनी विचारत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारवर निशाणा साधला आहे.  

टॅग्स :आदित्य ठाकरेएकनाथ शिंदेमहेश गायकवाडगणपत गायकवाड