Aaditya Thackeray on MNS: विधानसभा निवडणुकीत मानहानिकारक पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढलेल्या मनसेला एकही आमदार निवडून आणता आला नव्हता. त्यामुळे आता महापालिका निवडणुकीत मनसे महायुतीसोबत युती करण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात मनसे नेत्यांची बैठक देखील झाली असून या प्रस्तावार चर्चा झाल्याचे म्हटलं जात आहे. यावरुन ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकाऱ्यांची मंगळवारी मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीत युती नसल्यामुळे मनसेला मोठा फटका बसला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच युती फिसकटली आणि त्याचा फटका मनसे उमेदवारांना बसल्याचे म्हटलं जात आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीसोबत निवडणूक लढवावी, अशी मागणी मनसे नेत्यांनी केली आहे. यावरुनच आदित्य ठाकरेंनी बोलताना मी त्यांच्याकडे बघत नाही असं म्हटलं आहे.
मनसे आगामी महापालिका निवडणुकीसाठी कुणासोबत तरी युती करेल अशी चर्चा झाली. याकडे तुम्ही कसे बघता असा सवाल आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी, मी तरी त्यांच्याकडे बघत नाही. मी आपल्या कामांकडे बघत असतो, असं म्हटलं.
विधानसभेला झाले ते विसरा
दरम्यान, या बैठकीत राज ठाकरे यांनी सर्व गोष्टींचा आढावा घेतला. तसेच विधानसभा निवडणुकीत जे झाले, ते विसरा आणि महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले. मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांची जवळपास दीड तास बैठक पार पडली. तसेच महापालिका निवडणुकीसाठी मतदारसंघांच्या आढाव्यासाठी समिती तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ही समिती प्रभागातील उमेदवारांचा आढावा घेणार आहे.