मुंबई/नाशिक - शिवसेना शिंदे गटातील काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांकडून केला जात आहे. त्यातच, विदर्भ दौऱ्यावर असलेल्या सुषमा अंधारे यांनी लवकरच बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचे सांगितला. त्यातच, आज नाशिक दौऱ्यावर असलेल्या शिवसेनेच्या युवा नेत्यांनी म्हणजेच आदित्य ठाकरेंनी मंत्री दादा भुसे यांची भेट घेतल्याची चर्चा नाशिक जिल्ह्यात आणि सोशल मीडियावर रंगली आहे. मात्र, आता या भेटीवर दोन्ही नेत्यांकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोडवरील एका खासगी रिसॉर्टमध्ये ही भेट झाल्याचं बोललं जात आहे. आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर होते. तर, जिल्ह्यातील मंत्री आणि शिवसेना नेते दादा भुसे हेही नाशिकमध्ये असल्याने या दोन्ही नेत्यांची एका खासगी रिसॉर्टमध्ये बैठक झाल्याचे वृत्त माध्यमांत झळकले. दादा भुसेंनी एका कार्यक्रमातून अचानकपणे काढता पाय घेतल्याने ही चर्चा बळावली. मात्र, आमची कुठलीही भेट झाली नाही. माझ्या नातीचा पहिला वाढदिवस असल्याने आम्ही तो एका हॉटेलमध्ये साजरा करत आहोत. मी आत्ताही तिकडेच आलो आहे, असे सांगत दादा भुसे यांमनी भेटीचे वृत्त फेटाळले.
अदित्य ठाकरे यांनाही पत्रकार परिषदेत बोलताना आमच्यात कुठलीही भेट झाली नसल्याचं म्हटलं. 'मी पर्यटन मंत्री होतो, तेव्हापासून या रिसॉर्टबद्दल ऐकत होतो. आज येथे येण्याची संधी मिळाली. मागे मी एका लग्नासाठी येथे आलो होतो. या रिसॉर्टमध्ये पर्यावरण आणि पर्यटन एकत्र केलं आहे, म्हणून मी ते बघायला गेलो. छुप्या भेटींची गरज नाही. जे आहेत जगजाहीर असतं. कुणाला दरवाजे बंद ठेवायचे की उघडे ठेवायचे, हे उद्धव साहेब ठरवतील,' अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना दिली आहे.