मुंबई- राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळेल. दरम्यान, माजी मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे सातत्याने शिंदे गटावर टीका करताना दिसत आहेत. आजही आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली. विधीमंडळाच्या प्रांगणात आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला.
देवेंद्र फडणवीसांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचा आणि तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न झाला होता, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली होती. त्याबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी गद्दारी करण्याची अनेक कारणे दिली आहेत. आता मागच्या सहा महिन्यात गद्दारी करण्याचे हे बारावं कारण त्यांनी दिलंय. आता काय बोलणार? जे गद्दार आहेत ते गद्दारच राहणार, त्यांच्यावरचा गद्दारीचा शिक्का कधीही पुसला जाणार नाही, अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली.
ते पुढे बोलताना म्हणाले की, 'आज राज्यपालांनी भाषण केलं, त्यात महाविकास आघाडीच्या काळातलीच कामं आणि निर्णय होती. त्यांचे भाषण ऐकून त्यांनी दिशाभूल तर केली नाही ना, असे वाटले? त्याबाबत आम्ही माहिती घेणारच आहोत. ते गद्दार बोलतात, त्याकडे लक्ष देऊ नका. विविध घोषणा महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांमध्ये झाल्या, विविध वचनं देण्यात आली, मात्र गद्दारांनी कोणतीच वचनं पूर्ण केली नाहीत, अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली.