बेहिशेबी संपत्तीच्या याचिकेवर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, खरी संपत्ती सांगितली!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 07:07 PM2022-10-19T19:07:52+5:302022-10-19T19:09:43+5:30
राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या पक्षातील बंडामुळे चांगलेच अडचणीत आले आहेत.
मुंबई-
राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या पक्षातील बंडामुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. ४० आमदार आणि १२ खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून राज्याच्या राजकारणात भूकंप घडवून आणला. त्यानंतर, शिवेसना विरुद्ध शिंदे गट असा सामना रंगला असून शिवसेनेचं चिन्ह आणि नावही तात्पुरतं गोठविण्यात आलं आहे. एकंदरीत उद्धव ठाकरेंना अडचणीत आणण्यात येत असतानाच, आता उद्धव ठाकरेंच्या संपत्तीची ईडी आणि सीबीआय चौकशी करण्याची मागणी एका जनहित याचिकेद्वारे करण्यात आली आहे. याच याचिकेवर उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ठाकरेंची खरी संपत्ती कोणती ते सांगितलं आहे.
उद्धव ठाकरेंच्या संपत्तीची ईडी चौकशी करा, हायकोर्टात याचिका दाखल
"आमची खरी संपत्ती पाहण्यासाठी दसरा मेळाव्याला आले असता तर दिसली असती. लोकांचं प्रेम हीच आमची करी संपत्ती आहे", असं आदित्य ठाकरे म्हणाले. ते मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेत शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि त्यांची दोन्ही मुले आदित्य आणि तेजस ठाकरे यांच्या संपत्तीची ईडी आणि सीबीआयद्वारे चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. गौरी आणि अभय भिडे यांनी ही याचिका दाखल केली आहे. गौरी भिडे यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे साप्ताहिक आणीबाणीच्या काळात संक्षिप्त रुपाने छापले होते. न खाऊंगा, न खाने दुंगा.. या वाक्याने आपण प्रेरीत असल्याचे गौरी भिडे यांनी म्हटलं आहे. लाईव्ह लॉ वेबसाईटने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
भास्कर जाधवांच्या घरावरील हल्ल्याची चौकशीची मागणी
शिवसेनेचे ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी चौकशीची मागणी देखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली. "कधी कुठल्या मिरवणुकीत गोळीबार होतो. कधी कार्यालय फोडलं जातं. गद्दारांवर काहीच कारवाई केली जात नाही. या राज्याचं राजकारण एवढ्या खालच्या पातळीवर गेलं नव्हतं. काल रात्री साडेअकराच्या आसपास भास्कर जाधव यांची पोलीस सुरक्षा काढली गेली. त्याच्या बरोबर एक-दोन तासांनंतर हल्ला झाला आहे. त्यामुळे या हल्ल्याला राजकीय पाठबळ आहे का? याची सखोल चौकशी झाली पाहिजे", असं आदित्य ठाकरे म्हणाले.