मुंबई - ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय समजले जाणारे सूरज चव्हाण यांच्या घरी ईडीने धाड टाकली. जवळपास १७ तास ईडीच्या अधिकाऱ्यांनी चव्हाण यांची चौकशी केली. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबई महापालिकेतही तपास सुरू केला. या संपूर्ण प्रकरणानंतर माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सूरज चव्हाण यांच्या घरी जाऊन भेट दिली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.
आदित्य ठाकरे म्हणाले की, सत्य, न्याय हक्कासाठी आम्ही लढायला तयार आहोत, त्याविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई होतेय. हे सरकार घाबरट आहेत, लढायचे असेल तर तपास यंत्रणांना पुढे करून लढतायेत. मर्दांसारखे समोर येऊन लढावे. खोटा सर्व्हे काढता, निवडणुकांना सामोरे जा, लोकशाही असेल तर आपल्या देशात सरकारकडून लोकशाही मारली जात आहे. निवडणुका होत नाही. लोकप्रतिनिधी कुठेही नाही. मोठमोठी टेंडर काढली जातायेत. आमच्या मोर्च्याला घाबरून आता कारवाया सुरू झाल्या आहेत असा आरोप त्यांनी केला.
तसेच हे मिंदे गट आहे, शिवसेना नाव नाही. गद्दारांच्या मागे कुणीही उभे नाही. त्यामुळे ते निवडणुका घ्यायला घाबरत आहे. दबावाचे तंत्र वापरले जातेय. परंतु आम्ही दबावाला झुगारून लावतो. जे घाबरतात ते गद्दार गँगमध्ये जातात. आमची लढाई सत्यासाठी, लोकशाहीसाठी सुरू आहे. मुंबईतील भ्रष्टाचाराविरोधात आम्ही मोर्चा काढत आहोत. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक सगळीकडे प्रशासनाचा भ्रष्टाचार सुरू आहे. हे सरकार १०० टक्के खोके सरकार आहे असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला.
दरम्यान, जे स्वच्छ मनाचे आहेत ते आमच्यासोबत आहेत. ज्यांच्यावर डाग आहेत ते वॉशिंग मशिनमध्ये धुण्यासाठी ते जातात. हे सरकार आल्यापासून राज्यात दंगली भडकतायेत. सरकारमध्ये जर हिंमत असेल तर महाराष्ट्रात निवडणुका घ्या असं खुलं चॅलेंज आदित्य ठाकरे यांनी राज्यातील सरकारला दिले आहे.