लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: सीबीआयने दिशा सालियन प्रकरणाचा नाही तर सुशांत सिंग हत्येचा तपास केला होता. परंतु, त्या तपासात सीबीआयने क्लीन चिट दिल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र उद्धवसेनेचे आ. आदित्य ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात सादर केले आहे, असा आरोप शिंदेसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.
मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे सतीश सालियन यांनी दिशाच्या मृत्यूप्रकरणी तक्रार केली आहे. ही तक्रार मालवणी पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर करण्यासाठी पुढे पाठविण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल होईल. तसेच त्यांच्या खोट्या प्रतिज्ञापत्रावर कारवाई होईल, असे ते म्हणाले.
राज्य सरकारने नेमलेल्या एसआयटी मार्फत दिशा सालियन प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या हत्या प्रकरणाची चर्चा वाढल्यानंतर उद्धवसेनेने कुणाल कामराचे वादग्रस्त गाणे जाणुनबुजून व्हायरल केले, असा आरोपही निरुपम यांनी केला आहे.