भाजपची महत्त्वाची मागणी ठाकरे सरकार पूर्ण करणार? आदित्य ठाकरेंकडून महत्त्वाचे संकेत; दोन दिवसांत निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 02:31 PM2021-08-06T14:31:09+5:302021-08-06T14:34:42+5:30
भाजपनं सातत्यानं लावून धरलेली मागणी पूर्ण होण्याची दाट शक्यता; आदित्य ठाकरेंचं सूचक विधान
मुंबई: कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकलमधून प्रवास करू देण्याच्या मागणीसाठी आज मुंबईत विविध ठिकाणी भारतीय जनता पक्षानं आंदोलन केलं. या आंदोलनात भाजपचे महत्त्वाचे नेते, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. भाजपच्या या आंदोलनाला यश मिळणार असं दिसत आहे. मुंबई उपनगराचे पालकमंत्री असलेल्या आदित्य ठाकरेंनी याबद्दल महत्त्वाचं विधान केलं आहे.
'लोकल प्रवासाबद्दल दोन-तीन आठवडे चर्चा सुरू आहे. पुढच्या एक-दोन याबद्दल निर्णय होईल. दोन्ही डोस घेतलेल्यांना, केवळ लोकलच नव्हे, तर इतर गोष्टीत सूट देऊ शकतो का? याबाबत काळजीपूर्वक चर्चा होऊन निर्णय घेतला जाईल,' असं महत्त्वाचं विधान आदित्य ठाकरे यांनी केलं. त्यामुळे लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लवकरच लोकलमधून प्रवास करण्याची मुभा मिळू शकते.
सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास सुरू करावा अशी मागणी भाजपकडून सातत्यानं केली जात आहे. त्यासाठी आज अनेक ठिकाणी आंदोलनंदेखील करण्यात आली. त्यावर आदित्य यांनी भाष्य केलं. 'विरोधकांनी आंदोलन करावं. पण त्यांनी परिस्थिती, वस्तुस्थिती समजून घ्यावी. यात राजकारण नाही. लोकांचे जीव वाचवणं गरजेचं आहे. केंद्रानं पण तशा सूचना दिल्या आहेत. लवकरच काही सवलती दिल्या जातील" असं सूचक विधान आदित्य ठाकरेंनी केलं.
भाजपचं रेलभरो आंदोलन
सर्वसामान्य नागरिकांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी मिळावी, या मागणीसाठी भाजपकडून मुंबईतील चर्चगेट, कांदिवली, बोरिवली, घाटकोपर, ठाण्यात आंदोलन केलं. याशिवाय, अनेक ठिकाणी आंदोलन करण्यापासून भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवलं. दरम्यान, भाजपा कार्यकर्त्यांनी ठाकरे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत रेलभरो आंदोलन केलं. बस आणि विमानातून प्रवास करण्याची मुभा देण्यात येते. मग रेल्वेतून प्रवास का करू दिला जात नाही?, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला.
आज विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वात लोकल प्रवासासाठी मुंबईतील विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. दरेकरांसोबत यावेळी आमदार मंगलप्रभात लोढा, आमदार राहुल नार्वेकर उपस्थित होते. आंदोलनावेळी पोलिसांनी आमदार नार्वेकर यांना ताब्यात घेतलं. तर, तिकडे कांदिवलीत आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. शेकडो भाजपा कार्यकर्त्यांनी प्लॅटफॉर्मवर जाऊन जोरदार घोषणाबाजी केली.