Join us

विरोधकांच्या आरोपांना कामातून उत्तर देणार; मंगल प्रभात लोढा यांचे प्रत्युत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 8:16 PM

मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई महापालिकेत नव्याने सुरू करण्यात आलेल्या पालकमंत्री दालनात पत्रकारांशी संवाद साधला.

मुंबई: कॅबिनेट मंत्री व मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई महापालिकेत नव्याने सुरू करण्यात आलेल्या पालकमंत्री दालनात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महायुती सरकार जनतेमध्ये जाऊन काम करणारे सरकार असून, मुंबईतील पालकमंत्री कार्यालय हे जनतेसाठी कार्यरत राहणार आहे. मी घरी बसून किंवा सोशल मीडियावरून सरकार चालवत नाही. आम्ही महापालिकेच्या कार्यालयात बसून, नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन, त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असेही मंत्री लोढा यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री या नात्याने मी मुंबईत फिरलो, तसेच शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने काम केले असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यापूर्वी पालकमंत्री म्हणून मी मुंबई उपनगरातील सर्व 15 वार्डमध्ये फिरलो. यावेळी 15 हजारपेक्षा अधिक नागरिकांच्या समस्या प्राप्त झाल्या, त्यातील 3 हजारपेक्षा अधिक समस्यांचे जागीच समाधान देखील केले. त्यातून जनतेच्या हक्काच्या या कक्षाची आवश्यकता अधोरेखित होते. या ठिकाणी नागरिकांच्या अनेक समस्या मुख्य कार्यालयाशी निगडीत असल्याचे निदर्शनास आले. त्याचप्रमाणे मुंबई उपनगरचा पालकमंत्री या नात्याने, विविध बैठकीसाठी अधिकाऱ्यांना मंत्रालयात बोलवावे लागते. हे सर्व सुकर व्हावे, या हेतूने मुंबई महापालिका कार्यालयात पालकमंत्र्यांचे दालन सुरू करण्यात आल्याचे मंत्री लोढा यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर हे कार्यालय यापुढील काळात देखील मुंबई उपनगर जिल्ह्याचे जे पालकमंत्री होतील, त्यांचे कार्यालय म्हणून कार्यरत राहणार आहे. आदित्य ठाकरे यांचे सरकार होते, त्यावेळी मुंबईकरांनी अनेक समस्यांचा सामना केला आहे. त्यामुळे आता नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या कार्यालयाला ते का विरोध करत आहेत? असा प्रश्न देखील मंत्री लोढा यांनी यावेळी विचारला आहे. आमदार आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, मी या कार्यालयात बसलो असून, मुंबई उपनगरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यास आमचे प्राधान्य असून, आदित्य ठाकरे यांना जे म्हणायचे असेल, ते म्हणू द्या, अशी भूमिका लोढा यांनी घेतली.

मुंबईमधील अतिवृष्टी परिस्थितीची पाहणीमुंबई महानगपरलिकेच्या मुख्यालयात जाऊन मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थीची पाहणी केली. मुंबईमध्ये होणाऱ्या पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन नागरिकांना होणार त्रास कमी करण्यासाठीची दक्षता प्रशासनातर्फे घेण्यात येत आहे.

टॅग्स :मुंबईएकनाथ शिंदेआदित्य ठाकरेमुंबई महानगरपालिका