‘सह्याद्री’चे सिलिंग कोसळले; पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 08:38 AM2021-06-05T08:38:47+5:302021-06-05T08:40:47+5:30
आदित्य ठाकरे वेळीच सभागृहाबाहेर पडल्याने थोडक्यात बचावले.
मुंबई : पर्यावरण विभागाची बैठक संपत आली असतानाच, सह्याद्री अतिथीगृहाचे फॉलसिलिंग अचानक कोसळल्याने एकच धांदल उडाली. मंत्री आदित्य ठाकरे वेळीच सभागृहाबाहेर पडल्याने ते थोडक्यात बचावले. ही घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
पर्यावरण विभागाची बैठक सायंकाळी सुरू असतानाच मोठा आवाज झाला. काहीजण बाहेर धावले. फॉलसिलिंग कोसळल्याचे लक्षात येतात सुरक्षारक्षकांनी अधिकाऱ्यांना व ठाकरे यांना तातडीने बाहेर काढले. कोणालाही इजा झाली नसली, तरी हा प्रकार कशामुळे घडला, हा महत्त्वाचा प्रश्न बनला आहे. आदित्य ठाकरे यांनी घटनेचे फोटोही काढले व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्व माहिती दिली.
सह्याद्री अतिथीगृहाचे बांधकाम जवळपास २५ वर्षांपूर्वीचे आहे. तिथे फॉलसिलिंग कधी केले, याची माहिती आता सार्वजनिक बांधकाम विभाग घेत आहे. काही महिन्यांपूर्वी केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये कसलाही धोका नसल्याचे सांगितले होते. तरीही फॉलसिलिंग कोसळल्यामुळे त्या ऑडिटवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अतिथीगृहाच्या आत गेल्यानंतर, उजव्या हाताला कारंजाचा भाग आहे. त्या ठिकाणचे फॉलसिलिंग कोसळले. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत.