"निवडणूक स्पष्टीकरणाच्या पलीकडची, तरी..."; आदित्य ठाकरेंची इन्स्टा स्टोरी चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 02:04 PM2024-11-25T14:04:02+5:302024-11-25T14:08:08+5:30
Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरुन महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
Maharashtra Assembly Election Result 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा हादरा बसला आहे. शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचा विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. महाविकास आघाडीला ५० चा आकडाही गाठता आलेला नाही. त्यामुळे तिन्ही पक्षांवर मोठी नामुष्की ओढावली आहे. विधानसभेच्या निकालावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संशय व्यक्त केला आहे. अशातच ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही या निवडणुकीचा निकाल स्पष्टीकरणाच्या पलीकडचा असल्याचे म्हटलं आहे.
विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे केवळ २० आमदार निवडून आले आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे तब्बल ५६ आमदार निवडून आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विधानसभेचा निकाल अनपेक्षित असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांनी या निकालावर भाष्य केलं आहे.
आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरुन या निकालाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही पूर्वीपेक्षा अधिक मजबुतीने पुनरागमन करु असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. "समर्थन आणि आशीर्वादाचे मेसेज केल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. मी शक्य तितक्या लोकांना प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु माझ्याकडून कुणाला रिप्लाय करायचा राहून गेल्यास त्याबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो. ही निवडणूक नक्कीच अशी गोष्ट आहे ज्याचे स्पष्टीकरण देता येणार नाही. पण असे समर्थन आणि आशीर्वाद पाहून खरोखरच प्रोत्साहन मिळते. आम्ही पूर्वीपेक्षा अधिक ताकदीने परत येऊ आणि आमचे राज्य सर्वांसाठी पूर्वीपेक्षा चांगले बनवू," असं आदित्य ठाकरे यांनी आपल्या स्टोरीमध्ये म्हटलं आहे.
महाराष्ट्र माझ्याशी असा वागेल, विश्वास बसत नाही - उद्धव ठाकरे
दरम्यान, या निकालानंतर महाराष्ट्र माझ्याशी असा वागेल, विश्वास बसत नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. "हा निकाल सर्वसामान्य जनतेला पटला की नाही? हा प्रश्न पडलाय. हे आकडे पाहता सरकारला एखादं विधेयक विधानसभेत मांडण्याची गरजही राहणार नाही. भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा म्हणाले तसं सगळे पक्ष संपवून फक्त एकच पक्ष शिल्लक ठेवण्याच्या दिशेनं हा निकाल आहे काय? कोणत्या रागापोटी ही लाट उसळली हे कळत नाही. हा निकाल अनाकलनीय आहे. त्यामागचं गुपित काही दिवसांत शोधावं लागेल. पण लोकांनी निराश होऊन जाऊ नये किंवा खचून जाऊ नये," असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.