मुंबई: आरेमेट्रो कारशेडबाबत अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने समिती नेमली होती. आरेमधूनमेट्रो कारशेड अन्य ठिकाणी नेता येईल का? याबाबत ही समिती सरकारला अहवाल सादर करणार होती. यासाठी अर्थ खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी मंगळवारी समितीचा अंतिम अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला.
मनोज सौनिक यांनी सादर केलेल्या अहवालामध्ये मेट्रो 3चं कारशेड इतर ठिकाणी हलवणं व्यवहार्य नाही. त्यामुळे आरे कॉलनीमध्येच काशेडचं काम सुरु करण्यात यावे अशी शिफारस करण्यात आली आहे. यावर आरे मेट्रो कार शेडबाबत समितीचा अहवाल सादर झाला असला तरी तो बाईंडिंग नसल्याचे मत पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, आरे मेट्रो कार शेडबाबत समितीचा अहवाल सादर झाला असला तरी तो बाईंडिंग नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सादर केलेल्या अहवालावर अभ्यास करुन योग्य निर्णय घेतील. तसेच आम्हाला पर्यावरणाचे नुकसान करुन नाही तर शाश्वत विकासाच्या दिशेने पुढे जायचे आहे असं मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
आरेमधील मेट्रो कारशेड अन्य ठिकाणी घेऊन जाणं व्यवहार्य होणार नाही अशी शिफारस दिली असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. आरेमधून मेट्रो कारशेड दुसऱ्या ठिकाणी बनविण्यात यावं अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जात होती. मात्र समितीने दिलेल्या शिफारशीनुसार जर कारशेड अन्य ठिकाणी नेलं तर या प्रकल्पाचा खर्च, अनेक तांत्रिक बाबी वाढतील, तसेच मेट्रोच्या कामाला विलंबदेखील होईल त्यामुळे आरेमध्ये कारशेड राहणं योग्य आहे असं सांगण्यात आलं आहे.
मेट्रो कारशेड आरेमध्येच राहणार?; समितीने सोपवला मुख्यमंत्र्यांना अंतिम अहवाल
प्रधान सचिव (पर्यावरण) अनिल दिग्गीकर, व्यवस्थापकीय संचालक (मुंबई रेल्वे विकास महामंडळ) आर एस खुराना आणि मुख्य वनसंरक्षक (संजय गांधी राष्ट्रीय उद्यान) अन्वर अहमद यांचाही या चार जणांच्या समितीमध्ये समावेश होता. या समितीला मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागेचा शोध घेणे, झाडे तोडण्यापूर्वी सर्व परवानग्या घेतल्या आहेत का याची तपासणी करणे आणि आरेतील झाडांचे संरक्षण आणि जतन करणे याचा अहवाल देण्यासाठी सांगितले होते.