Join us

Eknath Shinde : आदित्य ठाकरे काँग्रेसच्या यात्रेत अन् खा. गजानन किर्तीकर शिंदे गटात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 9:33 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेण्यासाठी गजानन किर्तीकर आले होते. त्यानंतर, मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी जाहीर प्रवेश केला.

मुंबई - बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपत घेतल्यानंतर शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात गेले आहेत. त्यानंतर, राज्यातील विविध जिल्ह्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. तर, गेल्या काही दिवसांपासून उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाचे खासदार गजानन कीर्तिकर हे शिंदे गटात सामील होण्याची चर्चा रंगली होती. अखेर किर्तीकर यांचा शिंदे गटात प्रवेश झाला. त्यामुळे, शिंदे गटातील खासदारांची संख्या आता १३ वर पोहोचली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी गळाभेट घेत त्यांचे पक्षात स्वागत केले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेण्यासाठी गजानन किर्तीकर आले होते. त्यानंतर, मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी जाहीर प्रवेश केला. त्यामुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातही खासदार किर्तीकर यांनी जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली होती. तसेच, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जायला नको, असेही ते म्हणाले होते. आज एकीकडे आदित्य ठाकरेंनी राहुल गांधींच्या यात्रेत सहभागी होताच, इकडे किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. 

किर्तीकर यांनी यापूर्वी स्पष्टपणे भूमिका मांडल्याने ते शिवसेनेसोबतच म्हणजे उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात त्यांनी आपली भूमिका मांडताना शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर युती करुन चूकच केली, आता पुन्हा चूक नको असा सल्लाही जाहीरपणे दिला होता. त्यामुळे, ते शिवसेनेत नाराज असल्याची चर्चा रंगली. तेव्हापासून त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाची चर्चा सर्वत्र सुरू होती. 

ऑपरेशननंतर मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट

कीर्तिकर यांचे उजव्या पायाचे दि,१३ जुलै रोजी माहिम येथील रहेजा हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झाले होते. त्यामुळे दि,२१ जुलैला  दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कीर्तिकर यांच्या गोरेगाव ( पूर्व )आरे रोड येथील स्नेहदीप सोसायटी येथील निवासस्थानी भेट देवून त्यांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली होती. मुख्यमंत्र्यांसोबतच्या सातत्याच्या भेटीमुळे किर्तीकर शिंदे गटात सहभागी होतील, अशी चर्चा रंगली. मात्र, या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. 

टॅग्स :शिवसेनागजानन कीर्तीकरआदित्य ठाकरेएकनाथ शिंदेउद्धव ठाकरे