Nanavati-Max Hospital: नानावटी हॉस्पिटलचा विस्तार; ६०० बेड्सने क्षमता वाढणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 08:39 PM2022-05-11T20:39:05+5:302022-05-11T21:29:54+5:30
Nanavati-Max Hospital: मुंबईतील डॉ बालाभाई नानावटी हॉस्पिटलच्या परिसरात नव्या इमारतीची पायाभरणी महाराष्ट्र राज्याचे माननीय पर्यटन व पर्यावरण कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली.
मुंबई, - मुंबईतील डॉ बालाभाई नानावटी हॉस्पिटलच्या परिसरात नव्या इमारतीची पायाभरणी महाराष्ट्र राज्याचे माननीय पर्यटन व पर्यावरण कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी मॅक्स हेल्थकेयरचे अध्यक्ष व एमडी डॉ अभय सोई; माननीय परिवहन मंत्री अनिल परब; खासदार गजानन कीर्तिकर; आमदार पराग अळवणी आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. बालाभाई नानावटी हॉस्पिटल ट्रस्टचे अध्यक्ष श्री जयराज ठक्कर आणि इतर विश्वस्त देखील या समारोहामध्ये उपस्थित होते. नानावटी-मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आपली सध्याची ३५० बेड्सची क्षमता २०२४ पर्यंत ६०० पेक्षा जास्त बेड्सपर्यंत वाढवण्याची महत्त्वाकांक्षी विस्तार योजना सुरु केली आहे.
नव्या विस्तार योजनेमुळे रुग्णालयाची क्षमता ६०० पेक्षा जास्त बेड्सपर्यंत वाढेल. योजना पूर्ण झाल्यानंतर याठिकाणी ९५० पेक्षा जास्त आधुनिक पेशंट बेड्स असतील. नवी इमारत २०२४ पर्यंत सुरु होईल अशी अपेक्षा आहे. विस्तारानंतर नानावटी-मॅक्स हॉस्पिटल हे पश्चिम भारतातील सर्वात मोठ्या खाजगी रुग्णालयांपैकी एक म्हणून गणले जाईल.
विस्तार योजनेमध्ये एकूण ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल आणि याठिकाणी ५००० पेक्षा जास्त डॉक्टर्स, नर्सेस व इतर आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना रोजगार संधी मिळतील. वंचित समुदायातील लोकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळाव्यात यासाठी २०% बेड्स ठेवले जातील. यामुळे ही योजना पूर्ण झाल्यानंतर नवीन हॉस्पिटल कॉम्प्लेक्समध्ये आर्थिदृष्ट्या मागास वर्गांतील रुग्णांच्या उपचारांसाठी १८० बेड्सची सुविधा उपलब्ध होईल.
अतिशय नावाजल्या जाणाऱ्या, प्रतिष्ठित डॉ बालाभाई नानावटी हॉस्पिटलची पायाभरणी ४ ऑगस्ट १९४६ रोजी बॉम्बे राज्याचे पहिले मुख्यमंत्री श्री बी जी खेर यांनी केली होती. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे आशीर्वाद या रुग्णालयाला लाभले होते. रुग्णालयाचे उदघाटन देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९५० साली केले. रुग्णालयाच्या कँसर विंगचे उदघाटन मदर तेरेसा यांनी केले होते. गेल्या ७० पेक्षा जास्त वर्षांपासून ३५० पेक्षा जास्त बेड्सच्या सुविधांसह हे रुग्णालय आरोग्यसेवा प्रदान करत आहे. सध्या याठिकाणी १५०० पेक्षा जास्त डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर पूर्णकालीन कर्मचारी काम करतात.
यावेळी डॉ अभय सोई म्हणाले, "विस्तार योजनेमुळे आम्ही मुंबईबरोबरीनेच महाराष्ट्रातील इतर भागांमधील रुग्णांना अधिक चांगल्या आरोग्यसेवा प्रदान करू शकू. याठिकाणी जागतिक दर्जाचे वैद्यकीय तंत्रज्ञान उपलब्ध करवून दिले जाईल आणि अनेक नवे क्लिनिकल प्रोग्राम्स आणले जातील. रुग्णालयाची नवी इमारत पूर्णपणे सुरु झाल्यानंतर याठिकाणी हजारो आरोग्य कर्मचाऱ्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्यात मदत होईल. त्याबरोबरीनेच आमची ही विस्तार योजना हजारो गरजू कुटुंबांना निःशुल्क उपचार प्रदान करून समाजातील दुर्बल घटकांची सेवा देखील करेल."
कोविड महामारीच्या काळात नानावटी-मॅक्स हॉस्पिटलने कोविड-१९ च्या विरोधात लढण्यासाठी आपली क्लिनिकल, संचालन व पायाभूत संसाधने समर्पित करून आदर्श आरोग्यसेवेचे उदाहरण समाजासमोर ठेवले. गेल्या दोन वर्षात ६००० पेक्षा जास्त कोविड-१९ रुग्णांच्या उपचारांसाठी १५० पेक्षा जास्त बेड्स ठेवण्यात आले होते. याशिवाय जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेमध्ये योगदान देण्यासाठी या रुग्णालयाने महाराष्ट्रात ५०० ठिकाणी ८ लाखांहून जास्त नागरिकांना कोविड-१९ लसी दिल्या होत्या.