मुंबईकरांची 'बेस्ट' संकटातून बाहेर काढा; BMC आयुक्तांकडे आदित्य ठाकरेंच्या ३ मागण्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 08:06 AM2024-06-26T08:06:30+5:302024-06-26T08:08:37+5:30

बेस्टच्या बसदरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात असताना आदित्य ठाकरेंनी भाडेवाढ करू नये असं महापालिका प्रशासनाला पत्र लिहून मागणी केली आहे.

Aditya Thackeray letter to BMC Commissioner, demanding not to increase the price of BEST | मुंबईकरांची 'बेस्ट' संकटातून बाहेर काढा; BMC आयुक्तांकडे आदित्य ठाकरेंच्या ३ मागण्या

मुंबईकरांची 'बेस्ट' संकटातून बाहेर काढा; BMC आयुक्तांकडे आदित्य ठाकरेंच्या ३ मागण्या

मुंबई - Aaditya Thackeray on BEST ( Marathi News ) बेस्ट बससेवा संपवून सत्ताधाऱ्यांच्या कुठल्या कंत्राटदार मित्रांच्या खासगी सेवेला चालना देण्याचा डाव नसेल तर आपल्याकडे केलेल्या मागण्या तातडीने पूर्ण करून मुंबईकरांची बेस्ट संकटातून बाहेर काढाल असं सांगत माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र पाठवलं आहे. 

आदित्य ठाकरे यांनी पत्रात लिहिलंय की, मुंबईची जीवनवाहिनी आणि मुंबईकरांचा अभिमान असलेली बेस्ट बससेवा आर्थिक अडचणीत आहे. परंतु तिला पूर्वी मान्य केलेले आर्थिक सहाय्य करायला मुंबई महापालिकेने नकार दिल्याचं समजलं. लाखो मुंबईकरांना दररोज इच्छित स्थळी पोहचवणारी जगातील सर्वात स्वस्त आणि आधुनिक आरामदायी बससेवा म्हणून 'बेस्ट'ची ओळख आहे. तिच्या आधुनिकीकरणासाठी इंधन बचतीसाठी आणि पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी इलेक्ट्रिक बसेस आणण्याची संकल्पना राबवण्याचे कार्य माझ्या हातून होऊ शकले याचा मुंबईकर म्हणून अभिमान आहे असं त्यांनी सांगितले.

तर गेल्या २ वर्षाच्या काळात मुंबईच्या या बससेवेकडे प्रशासनाचे जाणुनबुजून दुर्लक्ष होत आहे. आर्थिक अडचणीत आलेली बससेवा कोलमडून पडण्याची शक्यता आहे. ज्याचा परिणाम मुंबईकरांच्या जीवनमानावर होणार आहे. जर मुंबई महापालिका MMRDA सारख्या संस्थेला आर्थिक सहाय्य करू शकते तर बेस्ट बससेवेलाही आर्थिक सहाय्य मिळायलाच हवे असं सांगत आदित्य ठाकरेंनी काही मागण्या केल्यात ज्याचा तातडीने आणि गांभीर्याने विचार करावा असं त्यांनी म्हटलं आहे. 

काय आहेत मागण्या?

बेस्ट सेवेला मुंबई महापालिकेने आर्थिक सहाय्य करावे
बेस्टची भाडेवाढ केली जाऊ नये
बेस्ट कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार आणि पेन्शन मिळत राहावी, तारीख चुकवली जाऊ नये
बसच्या संख्येतली नियोजित वाढ तातडीने अंमलात आणली जावी

दरम्यान, मुंबईकरांचा प्रतिनिधी म्हणून या मागण्या मी आपणासमोर ठेवतोय. मुंबईकरांसाठी महत्त्वाच्या असलेल्या बेस्ट बससेवेचे खच्चीकरण केले जाऊ नये असंही आदित्य ठाकरेंनी पत्रात सांगितले आहे.  
 

Web Title: Aditya Thackeray letter to BMC Commissioner, demanding not to increase the price of BEST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.