मुंबई : मेट्रो-३च्या आरे येथील कारशेडबाबत समितीचा अहवाल सादर झाला असला तरी तो बंधनकारक नाही. अहवालावर अभ्यास करून योग्य तो निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील. आम्हाला पर्यावरणाचे नुकसान करून नाही, तर शाश्वत विकासाच्यादिशेने पुढे जायचे आहे, असे मत पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३च्या भुयारीकरणाचा पंचविसाव्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्याचा सोहळा बुधवारी वरळी येथे आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. त्या वेळी ते बोलत होते.कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेसाठी आरे मेट्रो कारशेडबाबत अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने समिती नेमली होती. अर्थ खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी मंगळवारी समितीचा अंतिम अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपुर्द केला. मनोज सौनिक यांनी सादर केलेल्या अहवालामध्ये मेट्रो-३ कारशेड इतर ठिकाणी हलविणे व्यवहार्य नाही. त्यामुळे आरे कॉलनीमध्येच कारशेडचे काम सुरू करण्यात यावे, अशी शिफारस करण्यात आली आहे. यावर आरे मेट्रो कारशेडबाबत समितीचा अहवाल सादर झाला असला तरी तो बंधनकारक नसल्याचे मत आदित्य ठाकरे यांनी मांडले.कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३मुळे मुंबईकरांची प्रवासाची समस्या सुटेल. हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जवळपास ७८ टक्के भुयारीकरण आणि ५० टक्क्यांपेक्षा जास्त बांधकाम पूर्ण झाले आहे. मला खात्री आहे की, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन याच गतीने प्रकल्पाचे काम सुरू ठेवेल.- आदित्य ठाकरे,पर्यटन आणि पर्यावरणमंत्री
आरे कारशेडच्या अहवालावर अभ्यास करूनच योग्य निर्णय - आदित्य ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 5:22 AM