मुंबई - पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीमुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची भेट घेतली आहे. मुंबईच्या सुरक्षा व्यवस्थेवर त्यांनी अर्धा तासांपेक्षा जास्त वेळ चर्चा केली.
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर काल सायंकाळी स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळून आली होती. पोलिसांच्या तपासात बुधवारी रात्री ही गाडी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर पार्क केल्याचे समोर आले. आता ही गाडी चोरीची असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचप्रमाणे मुंबई पोलिसांच्या हाती काही महत्त्वाची धागेदोरे हाती लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या भेटीला गेले होते.
गाडी पार्क केल्यापासून सकाळपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जमा केले असून त्याची तपासणी केली जात आहे. गाडीतील व्यक्ती ही मागच्या सीटवरून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या विरुद्ध बाजूला असणाऱ्या फुटपाथवर उतरली आणि वाकून पुढे निघून गेल्याने पोलिसांच्या तपासात अडचणी निर्माण होत आहे. चेहऱ्यावर मास्कसह टोपी असल्याने त्या व्यक्तीची ओळख पटत नसल्याची माहिती मुंबई पोलिसांची दिली आहे. तसेच या घटनेमुळे मुंबईत पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून सुरक्षेचा आढावा आदित्य ठाकरे यांनी घेतल्याचं बोललं जात आहे.