मुंबई-
मुंबई महानगरपालिकेचा अनागोंदी कारभार आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वात आज मुंबई धडक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईत पावसाची रिपरिप सुरु असतानाही ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोर्चासाठी प्रचंड गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. मुंबईतील मेट्रो सिनेमा ते मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले आहेत.
धडक मोर्चात ठाकरे गटाचे महत्वाचे नेते देखील सहभागी झाले आहेत. यात खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, विनायक राऊत, अनिल देसाई यांच्यासह सुषमा अंधारे, माजी महापौर किशोरी पेडणेकर या महिला नेत्या देखील उपस्थित आहेत. मुंबई मनपाच्या मुख्यालयाजवळच एक व्यासपीठ उभारण्यात आलं असून या व्यासपीठावरुन आदित्य ठाकरे उपस्थितांना संबोधित करणार आहेत. आदित्य ठाकरे यावेळी आपल्या भाषणातून मुंबई मनपातील भ्रष्टाचाराची पोलखोल करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
मेट्रो सिनेमाजवळ आदित्य ठाकरे मोर्चात सगभागी होताच कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला. 'मुंबई आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची', अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे. तसंच कार्यकर्त्यांच्या हाती असलेल्या भगव्या झेंड्यांमुळे भर पावसात भगवं वादळ आल्याचं चित्र आहे.