मुंबई - शिवसेना पक्षात मोठी उलथापालथ झालेली असताना पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी आपलं मुख्यमंत्रिपद मान्य नसणं ही राक्षसी महत्त्वाकांक्षा असल्याचं म्हणत बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. तसेच, मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही नाव न घेता टिका केली. शिवसेना जिल्हाप्रमुखांना बोलताना उद्धव ठाकरे भावूक झाले होते. तर, आदित्य ठाकरेंनीही यावेळी भाषण करताना आई रश्मी ठाकरेंची आठवण सांगितली.
आदित्य ठाकरेंनी शिवसेना जिल्हाप्रमुखांशी संवाद साधताना शिवसेनेतील बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. प्राईस टॅग लावल्यासारखे हे सर्वजण गेल्याचं आदित्य म्हणाले. तसेच, वर्षा बंगल्यातून बाहेर पडताना शिवसैनिकांनी केलेली गर्दी, त्यांच्या डोळ्यातील अश्रू आणि भावनिक झालेलं वातावरण याची माहिती दिली. वर्षा बंगल्यातील कर्मचारीही त्यावेळी भावूक झाल्याचं त्यांनी सांगितलं. हे सगळं पाहून त्यांच्या आई रश्मी ठाकरेंनाही वाईट वाटलं होतं.
''वर्षा बंगला सोडला तेव्हा तेथील कर्मचारी आणि रस्त्यावर उभ्या शिवसैनिकांच्या डोळ्यात पाणी होतं. त्यावेळी माझ्या आईलाही खूप वाईट वाटलं. कारण, धोका मित्रपक्षाने दिला असता तर काही वाईट वाटलं नसतं, पण ज्यांना मोठं केलं त्याच आपल्या लोकांनी धोका दिल्याचं वाईट वाटत असल्याचं आईने त्यावेळी म्हटलं, अशी भावनिक आठवणही आदित्य ठाकरेंनी सांगितली. सत्ता येत असते, जात असते पण गेल्या अडीच वर्षात उद्धव ठाकरेंनी जे काम केलं आहे त्यामुळेच, लोक त्याचं समर्थन करत आहेत. महाराष्ट्रात अखंडता, शांतता ठेवणाऱ्या व्यक्तीला कोणीतरी धोका देत आहे, याचं वाईट वाटतं, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
आमदारांसाठी काय कमी केलं - उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना ठाकरे आणि शिवसेना असं नाव न वापरता जगून दाखवा असा इशाराही दिला. माझा फोटो न वापरता लोकांमध्ये वावरून दाखवा. कुटुंबप्रमुखाला धोका देताय याचं वाईट वाटत असल्याचंही त्यांनी सांगितलं. माझं मुख्यमंत्रिपद मान्य नसणं ही राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे. झाडाची फुलं न्या, फांद्या न्या पण तुम्ही मूळ नेऊ शकत नाही. हे सर्व भाजपनं केलं असून त्यांची आग्र्याहून सुटका करावी लागेल. तुम्हाला भविष्य दिसत असले तर खुशाल जा पण बंडखोर आमदारांसाठी काय कमी केलं, असा सवालही त्यांनी केलं.