Join us

जय जय बजरंग बली! दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 19:19 IST

काल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली होती. त्यानंतर राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. यानंतर मंदिरावरील कारवाईला आता स्थगिती देण्यात आली.

मुंबई : दादरच्या रेल्वे स्थानक परिसरात असलेले ८० वर्ष जुनं हनुमान मंदिर पाडण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली होती. यावरून काल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली होती. त्यानंतर राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. यानंतर मंदिरावरील कारवाईला आता स्थगिती देण्यात आली.

रेल्वे प्रशासनाकडून तसे आदेश काढण्यात आले आहेत. परंतु, या मंदिरावरील कारवाईला केवळ स्थगिती नको तर कारवाईचा हा आदेशच रद्द करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी या हनुमान मंदिरात जाऊन महाआरती देखील केली. यावेळी त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, सचिन अहिर यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते. 

त्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये याच मुद्द्यावरून आदित्य ठाकरे यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला होता. भाजपचे हिंदुत्व हे फक्त निवडणुकीपुरत आहे, उद्धव ठाकरे यांनी अनेकवेळा भाजपचे निवडणुकीपुरता असलेले हिंदुत्व उघड केले आहे. भाजपशासित राज्यातच हिंदुत्व धोक्यात आहे. मंदिर पाडण्याची नोटीस सुद्धा यांच्याच सरकारची आणि मंदिराच्या पाडकामाला स्थगिती देण्याचा निर्णय देखील यांच्याच सरकारचा, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला.

दरम्यान, दादरच्या हनुमान मंदिराला रेल्वेने नोटीस दिली होती. या मुद्यावरुन आज राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळाले. या मुद्यावरुन उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रेल्वे प्रशासनाला यासंदर्भात एक पत्र देखील पाठवले होते. त्यानंतर किरीट सोमय्या आज दर्शनासाठी आले होते. यावेळी, शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि भाजपा कार्यकर्ते आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले.त्यामुळे परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

टॅग्स :आदित्य ठाकरेदादर स्थानकरेल्वेशिवसेनाउद्धव ठाकरे