पुणे - राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंची भेट घेऊन देहू आणि आळंदी येथील इंद्रायणी नदीतील प्रदुषणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. क्षेत्र देहू आणि आळंदी या दोन्ही ठिकाणी वर्षभर लाखो वारकरी दर्शनासाठी येत असतात. दर्शनाला जाताना पवित्र इंद्रायणी नदीत स्नान करण्याची परंपरा आहे. तसंच वारकरी नदीचं पाणी तिर्थ म्हणूनही घेतात. परंतु, इंद्रायणी नदी सध्या प्रचंड प्रदूषित झाली असून त्यात स्नान करणं सोडाच पण हात-पाय धुणंही अपायकारक ठरु शकतं, असे रोहित पवार यांनी म्हटले.
आमदार दिलीप मोहिते आणि दोन्ही संस्थानच्या विश्वस्तांसोबत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन इंद्रायणी नदीची प्रदूषणाच्या विळख्यातून सुटका करण्याची विनंती केल्याचं रोहित यांनी सांगितलं. आदित्य यांनी आमचं संपूर्ण म्हणणं काळजीपूर्वक ऐकूण घेतलं आणि महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून राज्यातील तिर्थक्षेत्रांच्या ठिकाणच्या सर्वच नद्यांची स्वच्छता करुन त्या प्रदूषणमुक्त करण्याचा कार्यक्रम आखण्यात येत असल्याचं सांगितलं. तसेच यावेळी वारकरी संप्रदायाच्या विविध मागण्या, पंढरपूर देवस्थान परिसराच्या विकासासह तिथले अन्य प्रश्न, राज्यातील संतपीठाची स्थापना व विकास या विषयांवरही चर्चा झाली, असेही रोहित म्हणाले.
आदित्य ठाकरे यांची लोकांचं म्हणणं ऐकूण घेण्याची व त्यांच्याशी चर्चा करण्याची शैली आणि कामं मार्गी लावण्याची धडाडी पाहून माझ्यासोबतच्या विश्वस्तांनीही त्यांचं कौतुक केलं. त्यामुळे लवकरच इंद्रायणी नदितून स्वच्छ पाणी वाहताना आपल्याला दिसेल, असा विश्वासही रोहित पवार यांनी व्यक्त केला. दरम्यान, रोहित पवार सध्या विविध भागाती लोकांच्या समस्या घेऊन संबंधित खात्याच्या मंत्र्यांना व पदाधिकाऱ्यांना भेटताना दिसत आहे.