Join us

"दिशा सालियानवर अत्याचार करुन हत्या"; आरोपांवर आदित्य ठाकरे म्हणाले, "कोर्टात जे होईल..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 16:22 IST

दिशा सालियानच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली.

Disha Salian Death Case: दिशा सालियनच्या मृत्यू  प्रकरणावरून महाराष्ट्रातलं राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. या प्रकरणात माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या कथित भूमिकेची चौकशी करण्यासाठी दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आलीय. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून आदित्य ठाकरेंवर निशाणा साधण्यात येत आहे. या सगळ्या प्रकरणावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आपल्या मुलीच्या मृत्यूची एनआयए चौकशी करण्याची मागणी केली आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी याचिकेत सूरज पांचोली, आदित्य ठाकरे आणि डिनो मोरिया यांच्यावर आरोप केले आहेत. तसेच दिशा सालियानच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेत किशोरी पेडणेकर आणि पोलिसांनी आमच्यावर दबाव आणल्याचे म्हटलं. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी या आरोपांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

"पाच वर्षे सातत्याने बदनामीचा प्रयत्न होत आहे हे प्रकरण कोर्टात आहे त्यामुळे कोर्टातच बोलू. माझ्यावरून सभागृह बंद पाडले जात आहे. पाच वर्षापासून हेच चालू आहे. पण कोर्टात जे होईल ते होईल. पाच वर्षापासून मी यावर मुद्द्याचं बोलत आलेलो आहे आणि बोलत राहणार," अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली.

दरम्यान, दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत आदित्य ठाकरे यांचे नाव आल्याने भाजप आमदारांनी त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करताना मंत्री नितीश राणे यांनी ठाकरे यांचे नाव न घेता याबाबत भाष्य केलं. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात बलात्काराच्या आरोपीला तत्काळ तपासापूर्वी अटक करावी असे म्हटले आहे, असं नितेश राणे म्हणाले.

"याचिकेतल्या आरोपींवर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. आदित्य ठाकरे असं का म्हणत नाहीत की, जोपर्यंत माझ्यावर आरोप झालेला आहे तोपर्यंत मी आमदार म्हणून राहणार नाही. आदित्य ठाकरे स्वतःवर का काळा ठपका लावून घेत आहेत. मी इतकंच म्हणेन की, यामधून पळवाट काढणं बरोबर नाहीये," असं नितेश राणे म्हणाले.

टॅग्स :आदित्य ठाकरेमुंबईमुंबई पोलीसआदित्य ठाकरेदिशा सालियान मृत्यू प्रकरण