Join us

मातोश्रीवर नेते, पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक; आदित्य ठाकरे म्हणाले, “एक आमदार तिथे नाही”

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 11:22 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर शिवसेना आमदार, नेते, पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेतल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई: शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह पक्षाच्या ३५ हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारणात अगदी वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. यातच महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेकाली पार पडली. यानंतर पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मीडियाशी बोलताना दिवसभरातील राजकीय सत्तासंघर्षावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

यावेळी पत्रकारांनी आदित्य ठाकरे यांना विविध मुद्द्यावर प्रश्न विचारले. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवर गेले. यानंतर शिवसेनेचे आमदार, नेते, पदाधिकारी यांची एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली. यासंदर्भात आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर, तिथे एक आमदार उपस्थित नाही आणि तो मीच आहे. आता येथून मी मातोश्रीवर जाणार आहे, अशी मिश्किल टिपण्णी आदित्य ठाकरे यांनी केली. 

मी कधी कुणावर टीका केली नाही

वांद्रे पूर्व वसाहतीच्या संदर्भात प्रस्ताव आणला जाणार आहे, याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तसेच याबाबत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ही नौटंकी बंद करावी, गेल्या १० वर्षांपासून आम्ही यासाठी लढत आहोत, असा आरोप स्थानिक काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी यांनी केल्याबाबत आदित्य ठाकरे यांना विचारणा करण्यात आली. यावर, मी आरोप-प्रत्यारोपांवर कधीच बोललो नाही. मी कधीच कुणावर टीका केलेली नाही. मी तो बाइट ऐकला नाही, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. 

देशात लोकशाही आहे की नाही, हाच मोठा प्रश्न

राजकीय सर्कस थांबायला हवी. आपल्या देशात लोकशाही राहिली आहे की नाही, हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा परतण्याचे आवाहन केले आहे. तेथे आमचे आमदार अडकलेत, त्यांना येण्याची मुभा मिळायला हवी. ज्या पद्धतीने तिथे सुरक्षा देण्यात आली आहे, ती त्यांनी स्वतःहून मागून घेतलेली नाही. त्यामुळे कडेकोट बंदोबस्त काढून ज्यांना यायचे त्यांना यायला दिले पाहिजे, असा पुनरुच्चार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसेच एकनाथ शिंदे गटाकडून ठाकरे सरकारला देण्यात आलेल्या अल्टिमेटमविषयी विचारण्यात आले असता, चांगले आहे, एवढ्या दोन शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करत आदित्य ठाकरे हसत हसत तिथून निघून गेले. एक प्रकारे आदित्य ठाकरे यांनी त्या अल्टिमेटमची खिल्ली उडवल्याचे सांगितले जात आहे.  

टॅग्स :आदित्य ठाकरेउद्धव ठाकरेशिवसेना