Join us

"आरोप करण्यापेक्षा चांगल्या सूचना दिल्या तर नक्की काम करू", आदित्य ठाकरेंचं शेलारांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 12:30 PM

मुंबईतील नालेसफाईच्या मुद्द्यावरुन भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी राज्याचे पर्यटन मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली.

मुंबई

मुंबईतील नालेसफाईच्या मुद्द्यावरुन भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी राज्याचे पर्यटन मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. "भाजपाने नालेसफाईच्या कामाची दुसऱ्यांदा झाडाझडती घेण्याचा आजचा कार्यक्रम काल दुपारी ठरला. संध्याकाळी घोषित केला. पालकमंत्र्यांना कळताच काल संध्याकाळी म्हणे त्यांनी धावती पाहणी केली. एवढे दिवस कुठे होतात? सत्तेचा टांगा पलटी आणि सत्ताधारी फरार", अशी टीका आशिष शेलार यांनी केली. त्यावर आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. विरोधकांनी आरोप करण्यापेक्षा चांगल्या सूचना दिल्या तर नक्की त्यावर चांगलं काम करू आणि मी टीकांना फार महत्व देत नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले. ते मुंबईतील पावसाळ्याआधीच्या कामांच्या आढावा बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलत होते. 

आदित्य ठाकरे यांनी मुंबईत पावसाळ्याआधी केल्या जाणाऱ्या कामांचा आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यात आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील नालेसफाईची सविस्तर माहिती दिली. शहरात मान्सूनपूर्व काम युद्धपातळीवर सुरू असून नाल्यातील गाळ काढण्याचं काम ७८ टक्के पूर्ण झालं आहे, असा दावा आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला. शहरात ज्या ज्या ठिकाणी पाणी तुंबतं असा ठिकाणी पंपिंग स्टेशन आहेत. पण ते जाम होऊ नयेत यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे. यंदा हिंदमाता तुंबण्याची शक्यता फार कमी आहे असा दावा आदित्य ठाकरेंनी केला. 

दहिसर, पोयसर नदीवर आमचं काम सुरू आहे. पूराचं पाणी लोकांच्या घरात जाऊ नये यासाठी प्रयत्न करत आहोत. आमदारांना ६२ कोटींचा निधी वितरीत करण्यात आला आहे. इतरही रखडलेली कामे पूर्ण करत आहोत. शहरात मीही मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेतला आहे. लोकांकडून येणाऱ्या सूचनांचे तात्काळ निरसन करण्याचं काम केले जात आहे. आरोप करण्यापेक्षा चांगल्या सूचना केल्या तर नक्कीच चांगले काम होईल असा टोला त्यांनी आशिष शेलार यांचं नाव न घेता लगावला. 

नाल्यातील गाळ दररोज साफ होणं गरजेचंनाल्याची साफसफाई दैनंदिन पातळीवर होत असते. तुम्ही कितीही साफसफाई केली तरी रोजच्या कचऱ्यामुळे त्यात भर पडत असते. त्यामुळे मुंबईतील नाल्यांमधील साफसफाई दैनंदिन पातळीवर होणं गरजेचं असतं. त्यासाठी मुंबई महापालिका पूर्णपणे प्रयत्न करत आहे. नाल्याची साफसफाईसाठी दोन मुद्दे महत्वाचे असतात. यात नाल्यात साचणारा गाळ आणि पाण्यावर तरंगणारा कचरा साफ करणं महत्वाचं आहे. गाळ साचणं ही नैसर्गिक क्रिया आहे. त्यामुळे तो दरवर्षी तयार होत असतो. काल गाळ काढला आणि आपण आज पाहायला गेलो तरी त्याठिकाणी गाळ तयार झालेला असतो, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. शहरात सध्या दोन शिफ्टमध्ये गाळ काढण्याचं काम सुरू आहे. काही ठिकाणी जेसीबीच्या आवाजामुळे आणि इतर काही अडचडणींमुळे दोन शिफ्टमध्ये काम करणं शक्य होत नाही. तरीही महापालिका पूर्ण प्रयत्न करत आहे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :आदित्य ठाकरेमुंबई महापालिका निवडणूक २०२२मुंबईआशीष शेलार