मुंबई-
राज्याच्या विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंविरोधात बॅनरबाजी करत आंदोलन करण्यात आलं. यात आदित्य ठाकरेंचा उल्लेख महाराष्ट्राचे परमपूज्य युवराज असा करण्यात आला. तसंच आदित्य ठाकरेंची 'दिशा' नेहमीच चुकली, असा टोलाही लगावण्यात आला. त्यावर आता आदित्य ठाकरेंनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. शिंदे गटातील आमदारांची किव येते. तुमच्यात हिंमत असेल तर आधी राजीनामा द्या. चला मीही राजीनामा देतो आणि निवडणुकीला सामोरा जातो, असं थेट आव्हान दिलं आहे.
युवराजांची 'दिशा' नेहमीच चुकली, शिंदे गटाकडून आदित्य ठाकरे लक्ष्य; विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
"विधानभवनाच्या पायऱ्यांवर त्यांनी जी माझ्याविरोधात बॅनरबाजी केली ते पाहून मला त्यांची किव येते. संघातील ज्या खेळाडूची आपल्याला भीती असते त्याच्याच विरोधात स्लेजिंग केली जाते. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसून येत आहे. म्हणूनच माझ्याविरोधात अशी घोषणाबाजी केली जात आहे. हे रामराज्य नसून रावण राज्य आहे. मंत्रिपद मिळावं म्हणून इम्प्रेस करण्यासाठी माझ्याविरोधात आंदोलन केलं जात आहे", असा जोरदार हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी शिंदे गटातील आमदारांवर केला.
मंत्रिपद हवं पण जबाबदारी नको"आजही माझं तेच म्हणणं आहे की तुम्ही जर खरेच योग्य असाल तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरं जा. चला मीही राजीनामा देतो आणि निवडणुकीला सामोरं जातो. दाखवा हिंमत. जनतेला तुमची गद्दारी आवडलेली नाही. यापुढेही तुमचा गद्दारीचा मुखवटा असाच फाडत राहणार आहे. मंत्रिपदं हवी म्हणून गद्दारी केली. आता मंत्र्यांचे बंगले घोषीत झाले पण पालकमंत्री म्हणून अजूनही नियुक्त्या झालेल्या नाहीत. म्हणजे यांना मंत्री म्हणून फायदे हवेत पण जबाबदारी नको हे स्पष्ट दिसून येतं. त्यामुळेच जनतेत जाण्याची हिंमत दाखवा. जनता जे काही ठरवेल ते आम्हाला मान्य असेल", असंही आदित्य ठाकरे म्हणाले.