Join us  

"देशात काही झालं तर नेहरुंवर आणि राज्यात उद्धव ठाकरेंवर..."; अमित शाहांवर बोलले आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 4:03 PM

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं होतं

Aditya Thackeray : पुण्यात झालेल्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली होती. उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते आहे असे म्हणत अमित शाह यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. अमित शाह यांच्या विधानाची चर्चा होत असताना आमदार आदित्य ठाकरे यांनीही गृहमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. अमित शाह यांना स्वप्नात उद्धव बाळासाहेब ठाकरेच दिसत असतील असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे.

पुण्यात भाजपच्या दोन दिवस राज्य कार्यकारिणीचे आयोजन करण्यात आले होते. याचा समारोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थित झाला. यावेळी बोलताना अमित शाह यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका केली.  भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके कोण असेल तर शरद पवार आहेत. भ्रष्टाचाराला संस्थात्मक रुप देण्याचे काम हे शरद पवार यांनी केलं, अशा शब्दात शाहांनी शरद पवारांवर टीका केली. तर शाह यांनी महाविकास आघाडीचे वर्णन औरंगजेब फॅन क्लब असे केले. तर, उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते असल्याचे त्यांनी म्हटले आहे

यावरुनच आता आदित्य ठाकरे यांनी अमित शाह यांना प्रत्युत्तर दिलं. "मला वाटतं अमित शाह यांना स्वप्नात पण उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच दिसत असतील. कारण ३०३ जागांवरुन २४० जागांवर आणण्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा मोठा हात आहे. ते संविधान विरोधी जे काम करत होते त्यांना आम्ही रोखलं आहे. शरद पवार यांना पद्म पुरस्कार कोणत्या सरकारने दिला आहे. देशात कुठेही काही झालं तर जवाहरलाल नेहरुंवर ढकलतात आणि महाराष्ट्रात काही झालं तर उद्धव ठाकरेंवर ढकलतात," असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

काय म्हणाले होते अमित शाह?

"उद्धव ठाकरे हे कसाबला बिर्याणी खायला देणाऱ्या लोकांसोबत गेले आहेत. याकुब मेननला सोडण्याची मागणी करणाऱ्यांबरोबर गेले आहेत. पीएफआय संघटनेला पाठिंबा देणाऱ्यांचा मांडीला मांडी लावून बसले आहेत. संभाजीनगरला विरोध करणाऱ्यांना साथ देत आहेत. राज्यातील महाविकास आघाडी म्हणजे औरंगजेब फॅन क्लब आहे. तर, उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते आहेत," अशी टीका अमित शाह यांनी केली होती.

टॅग्स :उद्धव ठाकरेअमित शाहआदित्य ठाकरेशरद पवार