मुंबई - मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटत आहेत. मॉर्निंग वॉकला गेलेल्या संदीप देशपांडे यांच्यावर ४ अज्ञात इसमांनी हल्ला केला. या घटनेवर विधानसभेतही मुद्दा उपस्थित करण्यात आला. शिवसेना आमदार सदा सरवणकर, भाजपा आमदार नितेश राणे यांनी हा मुद्दा उचलत ठाकरे गटावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्यावरून होणाऱ्या आरोपावर आदित्य ठाकरे म्हणाले की, या फालतूपणाला मी उत्तर देऊ शकत नाही. रोज उठा, आदित्य ठाकरेंना शिव्या द्या आणि फेमस व्हा, ही स्कीम सुरु झालीय. त्या पक्षाला किंवा भाजपाची जी टीम असेल त्यांना कळालं पाहिजे की, उद्धव ठाकरेंची नकल करून किंवा मला शिव्या देऊन पक्ष काही वाढत नाही. त्यापेक्षा कामाला लागा आणि लोकांची सेवा करा. अशा फालतू आरोपांना मी उत्तर देत नाही असा खोचक टोला मनसेला लगावला आहे.
काय म्हणाले नितेश राणे?आमदार नितेश राणे यांनी अधिवेशनावेळी विधानसभेत हा मुद्दा उचलत म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी सकाळी हल्ला केला. या हल्ल्यावेळी काही राजकीय नेत्यांची नावे आरोपींनी घेतली. पोलीस तपासात या सर्व गोष्टी बाहेर येतील मात्र गेल्या काही काळात संदीप देशपांडे सातत्याने वरुण सरदेसाई नावाच्या व्यक्तीबद्दल आरोप करत आहेत. मागील सरकारमध्ये या वरुण सरदेसाईची काय ताकद होती हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे आपल्या माध्यमातून या प्रकरणात काहीतरी झाले पाहिजे अशी मागणी विधानसभेत केली.
आदित्य ठाकरे, संजय राऊतांना ताब्यात घ्या - खोपकरआदित्य ठाकरे, संजय राऊत यांना मुंबई पोलिसांनी तात्काळ ताब्यात घ्यावे आणि चौकशी करावी. गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिकेचे भ्रष्टाचार संदीप देशपांडे बाहेर काढतायेत. आदित्य ठाकरे, संजय राऊतांची चौकशी करून त्यात तथ्य निघाले तर त्यांना अटक करावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे. संदीप देशपांडे गप्प बसणार नाहीत असं विधान मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी करत आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.