Join us

मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला शिवसैनिकांनी मारहाण केल्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 10:11 PM

'शांत आणि संयमी राहून दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी आक्रमकता दाखवू'

मुंबई : वडाळा परिसरात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या हीरामणी तिवारी नावाच्या व्यक्तीला शिवसैनिकांनी मारहाण करून त्याचे मुंडन केले. यावर शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरणाऱ्या ट्रोलिंगवर शिवसैनिकांची संतप्त प्रतिक्रिया उमटल्याचे समजते असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री धार्मिक सलोखा टिकवण्याचा प्रयत्न करत असून, सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल जनतेच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे सांगितले. याबाबतची पोस्ट आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर केली आहे. 

आदित्य ठाकरे म्हणाले, "जे मत व्यक्त केले, त्यामुळे तुमच्या भावना दुखावल्या हे मी समजू शकतो. पण आपण आपल्या मुख्यमंत्र्यांचा आदर्श डोळयासमोर ठेऊ. शांत आणि संयमी राहून दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी आक्रमकता दाखवू. लोकांची सेवा करुन त्यांची मने जिंकू." याशिवाय ट्रोलर्सचा पराभव होणार असून कोणताही कायदा हातात न घेण्याचा सल्ला आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला आहे.

दरम्यान, रविवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर टाकली म्हणून हिरामणी तिवारी यांच्या घरी शिवसेना शाखाप्रमुख समाधान जुगदर यांनी दोन इसमांनी पाठवून मारहाण केली आणि शिवीगाळ करून धमकी दिली. तसेच, मशीनने त्याचे केस कापून मुंडन केले. त्यावेळी पोलीस तात्काळ घटनास्थळी पोचले आणि दोन इसमांनी पोलिसांनी ताब्यात घेतले. दोघांचे जबाब नोंद केले असता त्यांनी त्यांच्यात समजोता झाल्याचे सांगून एकमेकांविरुद्ध तक्रार नसल्याचे सांगितले. मात्र, मुख्यमंत्र्यांविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तिवारी यांचा जबाब नोंद करून समाधान जुगदर आणि त्यांच्या साथीदारांच्या विरोधात भा. दं. वि. कलम ३२३, ५००, ५०४, ५०६, ३४ अन्वये वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली.

टॅग्स :आदित्य ठाकरेशिवसेना