वरळीमध्ये गुजराती, तेलगू भाषेचे होर्डिंग्स लावण्यावर आदित्य ठाकरे म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 08:36 PM2019-10-02T20:36:57+5:302019-10-02T20:37:37+5:30
आदित्य ठाकरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वरळीमध्ये विविध ठिकाणी म्हणजे गुजराती, तेलगू भाषेत मोठे होर्डिंग्स लावण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर आदित्य ठाकरे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात होती.
मुंबई: महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे या निवडणुकीत ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे चिरंजीव व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेवरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणुक लढविणार आहेत. परंतु आदित्य ठाकरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वरळीमध्ये विविध ठिकाणी म्हणजे गुजराती, तेलगू भाषेत मोठे होर्डिंग्स लावण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर आदित्य ठाकरे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात होती. मात्र आदित्य ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया देत हा निवडणुकीतील कॅम्पेनचा भाग असल्याचे वरळीमध्ये प्रचार करत असताना सांगितले आहे.
Mumbai: Shiv Sena puts up posters of Aditya Thackeray which say 'How are you Worli?' in different languages. He is contesting #MaharashtraAssemblyPolls from Worli constituency. https://t.co/kurUjKEGT7pic.twitter.com/CpgCaGr1r1
— ANI (@ANI) October 2, 2019
आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, वरळीमध्ये विविध भाषेमध्ये होर्डिग्स लावणे हा एक विधानसभा निवडणुकीतील कॅम्पेनचा पहिला टप्पा आहे. तसेच येत्या 24 तासात विविध भाषेत होर्डिग्स का लावण्यात आले याचे उत्तर मिळणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे ज्या लोकांनी असे होर्डिग्स लावल्यामुळे टीका केली त्यांनी कधाचित लवकर केली का हे देखील बाहेर येणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
वरळीमध्ये मराठी मतदारांसोबतच इतर भाषिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न होताना दिसून येत आहे. यासाठी शिवसेनेने वरळी मतदारसंघात मोठे मोठे होर्डिंग्स लावण्यात आले. यात विशेष म्हणजे गुजराती, तेलगू भाषेत लावलेल्या या होर्डिंग्समुळे आदित्य ठाकरे आणि शिवसेनेवर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली. सोशल मीडियावर हाच का शिवसेनेचा मराठी बाणा असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला होता. त्यामुळे शिवसेनेने असं का केलं नेमकं त्यांना या कॅम्पेनद्वारे काय सांगायचे आहे, हे येत्या 24 तासांत मुंबईकरांना समजणार आहे.