मुंबई - एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी बंडखोरी करत उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची नामुष्की ओढवली होती. त्यानंतर आता लोकसभेतही शिवसेनेला मोठा धक्का बसला असून, शिवसेनेच्या १२ खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. दरम्यान, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी या बंडखोरांचा समाचार घेण्यास सुरुवात केली असून, त्यांच्यावर घणाघाती टीका केली आहे, घोटाळे, लफडी तुम्ही केली आणि त्यानंतर स्वत:ला वाचवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
सेनेच्या १२ खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर मुंबईत शिवसैनिकांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले की, भ्रष्टाचार, घोटाळ्याच्या फाईल्स उघडल्या गेल्याने या नेत्यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केली आहे. घोटाळे आणि लफडी तुम्ही केली आहेत. आता त्याच्यापासून वाचण्यासाठी तुम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खुपसला, असा संताप आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
शिवसेनेच्या आमदारांनंतर लोकसभेतील १२ खासदारांनीही एकनाथ शिंदेंना पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याने तो शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. तसेच या १२ आमदारांना वेगळा गट म्हणून लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिली आहे. तसेच या गाटाचे गटनेते म्हणून राहुल शेवाळे आणि प्रतोद म्हणून भावना गवळी यांना लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे विधानसभेपाठोपाठ लोकसभेतही शिवसेनेत उभी फूट पडली आहे.