Join us

Aditya Thackeray:'महाराष्ट्राचे राजकारण इतके घाणेरडे नव्हते, कठोर कारवाई होणार'; आदित्य ठाकरेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2022 7:44 PM

Aditya Thackeray: आज अचानक शेकडोच्या संख्येने आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानात घुसून घरावर चप्पल आणि दगडफेक केल्याची घटना घडली आहे.

मुंबई: मागील पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आज वेगळेच वळण मिळाले. काल न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन संपले असे वाटत असताना आज अचानक शेकडोच्या संख्येने आलेल्या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानात घुसून घरावर चप्पल आणि दगडफेक केली. या प्रकरणावर राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांनी 'कारवाई होणार', अशी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी शरद पवारांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. आदित्य ठाकरे हेदेखील यावेळी उपस्थित होते. बंगल्यातून बाहेर आल्यानंतर माध्यमांसी बोलताना आदित्य ठाकरे यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आणि कडक शब्दात इशारा दिला. ते म्हणाले की, ''महाराष्ट्राचे राजकारण इतके घाणेरडे कधीच नव्हते. यापूर्वी कुणाच्याच घरावर अशाप्रकारचे आंदोलन झाले नव्हते. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन कठोर कारवाई केली जाईल."

कर्मचाऱ्यांकडून चप्पल-दगडफेक

यावेळी अनेक संपकरी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या घराकडे चप्पलफेक आणि दगडफेक केली. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे सुरुवातीला निवासस्थानातील सुरक्षा कर्मचारी आणि पोलिसांनी संपकरी कर्मचाऱ्यांना अडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण शेकडोच्या जमावासमोर त्यांचा निभाव लागला नाही. यानंतर आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा सिल्वर ओकमध्ये दाखल झाला. या संपकरी कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या संख्येने महिलाही सहभागी झाल्या आहेत. त्या आपल्या हातील बांगड्या वाजवून सरकारविरोधात निषेध व्यक्त करत आहेत.

कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

यावेळी पोलिसांनी शेकडो कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. कर्मचाऱ्यांची संख्या शेकडोंच्या घरात असल्याने पोलिसांनी पोलीस व्हॅनसह स्कूलबस मागवल्या आहेत. त्यात पुरुषांसह महिला कर्मचाऱ्यांनाही बसवण्यात येत आहे. यावेळी अनेक कर्मचारी सरकारविरोधात घोषणाबाजी देण्यासोबतच विलिनीकरणाची मागणी करत आहेत. विलिनीकरणाशिवाय आम्ही मागे हटणार नाही, असे कर्मचाऱ्यांचे म्हणने आहे.

काय आहे न्यायालयाचा निकाल?

सिंह आणि कोकरूच्या लढाईत आम्हाला कोकराचे रक्षण करावे लागेल, असे म्हणत उच्च न्यायालयाने गुरुवारी एसटी कर्मचाऱ्यांना कारवाईची भीती न बाळगता 22 एप्रिलपर्यंत सेवेत रुजू  होण्याचे आदेश दिले होते. तसेच, कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन आणि ग्रॅच्युएटी देण्यासह त्यांच्यावर कारवाई न करण्याची सूचना एसटी महामंडळाला केली होती. पण, आज पुन्हा एसटी कर्मचारी आक्रमक झालेले पाहायला मिळाले. शेकडोच्या संख्येने एसटी कर्मचारी शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानात घुसले आणि घोषणाबाजी केली.

टॅग्स :आदित्य ठाकरेशरद पवार