शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय समजले जाणारे सूरज चव्हाण यांच्या घरी ईडीने धाड टाकली. जवळपास १७ तास ईडीच्या अधिकाऱ्यांनी चव्हाण यांची चौकशी केली. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबई महापालिकेतही तपास सुरू केला. या संपूर्ण प्रकरणानंतर माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सूरज चव्हाण यांच्या घरी जाऊन भेट दिली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. तर, मुंबई महापालिकेनं आज शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यालयावरही जेसीबी चालवला. त्यावरुनही आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाला इशारा दिलाय.
मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून वांद्रे पूर्व परिसरात असलेल्या ठाकरे गटाच्या वतीने थाटण्यात आलेल्या कार्यालयावर हातोडा पडला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीपासून अवघ्या १५ मिनिटांवर असलेल्या या कार्यालयावर महानगरपालिकेने हातोडा चालवला. ठाकरे गटाच्या वतीने उभारले गेलेले ऑटो चालक वेलफेअर असोशिएशनचे कार्यालय अनधिकृत असल्याचा दावा मनपा अधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे या कार्यालयावर कारवाई करण्यात आल्याची माहिती मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने दिली. या कारवाईवेळी स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेवरही हातोड्याचे आघात झाले, त्यावरुन आदित्य ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे.
बाळासाहेबांचे वारसदार म्हणवणाऱ्या ह्या गद्दारांचा द्वेष इतका टोकाला गेलाय की आता ठाकरेंना संपवण्याच्या सूडबुद्धीने थेट हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या प्रतिमेवर आघात करण्याची हिम्मत त्यांच्यात आलीये. द्वेषाने तुम्ही आमच्या प्रतिमा फाडाल, शाखा तोडाल, पण जनतेशी आमचं जे पक्कं नातं आहे, ते कसं संपवू शकाल?, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, आपल्या ट्विटर हँडलवरुन नगरसेवक हाजी हलीम यांच्या शाखेतील कमानीचा बोर्ड काढून टाकतानाचा व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओत ही कमान काढून टाकत असताना कमानीवरील स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेवर कमान काढणाऱ्या कामगाराकडून हातोड्याने आघात केल्याचं दिसून येत आहे.
ईडी कारवाईवरुनही आदित्य यांचा संताप
सत्य, न्याय हक्कासाठी आम्ही लढायला तयार आहोत, त्याविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई होतेय. हे सरकार घाबरट आहेत, लढायचे असेल तर तपास यंत्रणांना पुढे करून लढतायेत. मर्दांसारखे समोर येऊन लढावे. खोटा सर्व्हे काढता, निवडणुकांना सामोरे जा, लोकशाही असेल तर आपल्या देशात सरकारकडून लोकशाही मारली जात आहे. निवडणुका होत नाही. लोकप्रतिनिधी कुठेही नाही. मोठमोठी टेंडर काढली जातायेत. आमच्या मोर्च्याला घाबरून आता कारवाया सुरू झाल्या आहेत असा आरोप त्यांनी केला. तसेच हे मिंदे गट आहे, शिवसेना नाव नाही. गद्दारांच्या मागे कुणीही उभे नाही. त्यामुळे ते निवडणुका घ्यायला घाबरत आहे. दबावाचे तंत्र वापरले जातेय. परंतु आम्ही दबावाला झुगारून लावतो. जे घाबरतात ते गद्दार गँगमध्ये जातात. आमची लढाई सत्यासाठी, लोकशाहीसाठी सुरू आहे. मुंबईतील भ्रष्टाचाराविरोधात आम्ही मोर्चा काढत आहोत. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक सगळीकडे प्रशासनाचा भ्रष्टाचार सुरू आहे. हे सरकार १०० टक्के खोके सरकार आहे असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला.