Aditya Thackeray: शिवसेनेचीही तशीच अवस्था अन् आदित्य ठाकरेंनी भरपावसात घेतली सभा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 12:12 AM2022-07-21T00:12:30+5:302022-07-21T00:15:08+5:30
Aditya Thackeray: आदित्य ठाकरे यांनी गेल्या 15 दिवसांपासून पक्षांच्या कामात स्वत:ला झोकून दिलं आहे
मुंबई - राज्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर भाजपशी हातमिळवणी करुन त्यांनी महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केलं आहे. या सरकारमध्ये ते स्वत: मुख्यमंत्री बनले असून देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे, शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना राज्यातील राजकारणात रंगला आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत, असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे, आता शिवसैनिकांशी संवाद साधून ते पक्षात सक्रीय झाले आहेत. तर, आदित्य ठाकरे यांनीही निष्ठा यात्रेला सुरुवात केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी गेल्या 15 दिवसांपासून पक्षांच्या कामात स्वत:ला झोकून दिलं आहे. ते शाखेत जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत, रस्त्यावर उतरुन शिवसैनिकांना आपली भूमिका समजावून सांगताना, बंडखोर आमदार आणि नेत्यांवर जोरदार निशाणा साधत आहेत. आज वडाळ्यामध्ये आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा सुरू होती. यावेळी, बोलत असताना अचानक पाऊस आला. त्यावेळी, आदित्य यांनी छत्री न घेता पावसात भिजून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आदित्य यांच्या या सभेला पावसातही गर्दी दिसून आली. आदित्य यांचा हा जोश पाहून अनेकांना शरद पवार यांच्या साताऱ्यातील पावसात झालेल्या सभेची आठवण झाली.
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे जी यांनी आज वडाळा येथील शिवसेना शाखा क्र. १७८ ला भेट दिली. यावेळी भर पावसातही शिवसैनिकांनी दिलेला प्रतिसाद वाखाणण्याजोगा होता. कोसळणाऱ्या पावसाला साक्ष ठेवत, हे नाटकी सरकारही कोसळणार, असा विश्वास आदित्य जी यांनी शिवसैनिकांना दिला. pic.twitter.com/4zrjyOJVQS
— ShivSena - शिवसेना (@ShivSena) July 20, 2022
शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष अशाच रितीने फुटत होता, दिग्गज नेते राष्ट्रवादीला सोडून भाजपासह दुसऱ्या पक्षात जात होते. त्यावेळी, वयाच्या ऐंशीवर्षी शरद पवार स्वत: मैदानात उतरले होते. खासदारकीच्या निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी ते साताऱ्यात सभेला संबोधित करत होते. नेमकं त्याचवेळेस पाऊसाची हजेरी लागली अन् शरद पवारांनी भरपावसात सभा घेतली. या सभेनंतर राज्यात एक भावनिक लाट पसरली आणि राष्ट्रवादीने साताऱ्याची जागा जिंकली तर शरद पवारांनी लोकांची मनं जिंकली. आता, आदित्य यांनीही अशाच परिस्थितीत, शिवसेनेत सामना सुरू असताना भरपावसात सभा घेतली आहे.