मुंबई- आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात जाऊन तोंडाच्या वाफा घालवण्यापेक्षा आमदारकीचा राजिनामा देऊन स्वत: वरळीतून पुन्हा युतीसमोर निवडणुक लढवून दाखवावी, असे थेट आव्हान मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी दिले आहे.
आदित्य ठाकरे यांच्या काल ठाण्यात केलेल्या वक्तव्याचा समाचार आज मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी घेतला असून वरळीतील जनता दुर्बिण घेऊन आमदारांना शोधते आहे. वरळीतून आमदार गायब असून वरळीतून पुन्हा विजयी होणार नाही म्हणून ते ठाण्यात जाऊन तोंडाच्या वाफा काढत आहेत, अशा शब्दात आमदार ॲड आशिष शेलार यांनी समाचार घेतला आहे.
वरळीत गेले २० वर्षे झोपडपट्टी पुनर्विकासाचे प्रकल्प रखडले आहेत, यांच्या काळात वरळीत पुर्नर्विकासामध्ये घोटाळे झाले पण सामान्य माणसाच्या घरांची एक विटही रचली गेली नाही. कोळीवाडा गावठाणातील जनतेची कोरोना काळात जे हाल झाले ते मुंबईकरांनी पाहिले. तर वरळील कोळी बांधव कोस्टल रोडच्या दोन खांबामधील अंतराबाबत जी तक्रार करीत होते, ती ऐकायला त्यावेळी पालकमंत्री असलेल्या आदित्य ठाकरे यांना वेळ नव्हता, अखेर तो प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गी लावला. वरळीतील बिडिडि चाळींच्या इमारतींची उंची ठाकरे सरकारच्या काळात वाढविण्यात आली आता येथील नागरीक वाढीव खर्च होणार नाही ना म्हणून नागरीक चिंतेत आहेत.
गोलफा देवीच्या मंदिराचे काम अर्धवट होते, धोबी घाटातील नगरिक शौचालयाची मागणी करीत आहेत. अशा प्रकारे वरळीतील जनता परेशान असून वरळीतील मतदार आमदारांना दुर्बिण घेऊन शोधत आहेत. त्यामुळे दुसऱ्यांना आव्हान देण्यापेक्षा आदित्य ठाकरे यांनी आपलं जेवढं बळ आहे तेवढंच बोलावं त्यांनी राजिनामा द्यावा आणि युती समोर उभे राहून वरळीतून लढून दाखवावे, असे थेट आव्हान आमदार ॲड आशिष शेलार यांनी दिले आहे.
योग्य वेळी योग्य गोष्टींचा खुलासा करू
राजकारणात भेटी होतच असतात, राजकीय चर्चा होतात, वैयक्तीक भेटी गाठी होतात, तशाच राजकीय भेटी होतात, मन की बात झाली, जन की बात झाली, महाराष्ट्राची सुध्दा बात झाली. बात निकलही है तो दूर तक जाये गी.. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेल्या प्रमाणे मनसेबाबतचा योग्य वेळी योग्य गोष्टींचा खुलासा करू, आज याबाबत अधिक बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया पत्रकारांच्या प्रश्नांवर आमदार ॲड आशिष शेलार यांनी दिली.