Join us

"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 4:33 PM

Aditya Thackeray vs Election Commission, Mumbai Lok Sabha Election 2024: मतदानाचा टक्का कमी होण्यासाठी मुद्दाम मतदान प्रक्रिया संथ केली जात असल्याचा आरोप

Aditya Thackeray vs Election Commission, Mumbai Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्याचे मतदान आज सकाळपासून सुरु झाले. महाराष्ट्रातील लोकसभा मतदानाचा हा शेवटचा टप्पा आहे. या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघांचाही समावेश आहे. मुंबईतील अनेक मतदारसंघात बूथवर इव्हीएम बिघडल्याच्या घटना घडल्या. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे हे मतदारसंघात प्रत्येक बूथवर जावून पाहणी करताना दिसले. याचदरम्यान त्यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले. तसेच मतदानाचा टक्का कमी होण्यामागे मुद्दाम मतदान प्रक्रिया संथ केली जात असल्याचा आरोप लावला.

निवडणूक आयोगाकडून योग्य नियोजन केलेले नाही. पोलिंग बूथवर आवश्यक सुविधा नसल्याने मतदानाचा टक्का घसरला आहे. मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मुंबईकर मतदानासाठी रस्त्यावर उतरत नाही अशी नेहमी टीका केली जाते. पण आज मुंबईकर मतदानासाठी उतरले आहेत. निवडणूक आयोगाकडून मुद्दाम मतदान प्रक्रिया संथगतीने केली जात आहे," असे आदित्य ठाकरे टीव्हीनाइनशी बोलताना म्हणाले. "खरे पाहता मतदारांचा खूप चांगला प्रतिसाद आहे. आज आमचा नव्हे तर लोकांचा दिवस आहे. मी पत्रकारांना सांगतो की त्यांनी बूथवर जाऊन आढावा घ्यावा. काही ठिकाणी मुद्दाम संथगतीने मतदान प्रक्रिया केली जात आहे," असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

त्याआधी आदित्य ठाकरे यांनी वांद्रे परिसरात मतदान केले. त्यानंतर त्यांनी मतदारांच्या रांगा पाहता निवडणूक आयोगाला उद्देशून एक व्हिडीओ ट्विट केला. "हा व्हिडीओ निवडणूक आयोगासाठी आहे. मुंबईत आज मतदान आहे आणि सगळे मुंबईकर सकाळपासून मतदान करण्यासाठी बाहेर पडले आहेत. पण प्रश्न हा आहे की मुंबईतील पोलिंग बूथवर सोयीसुविधा फार कमी आहेत. सगळे उन्हात उभे आहेत. पंखेसुद्धा लावण्यात आले नाहीत. एक दोघांना चक्कर सुद्धा आली. पाण्याची सोय नाही. सावलीत कुठे रांगा उभ्या केल्या नाहीत. ही सर्व जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. मतदान करा असे मेसेज आणि कॉल्स इलेक्शन कमिशनकडून येत होते. पण मुंबईकर रस्त्यावर उतरल्यानंतर अशा गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच मतदानाचा टक्का कमी होतोय," असे आदित्य ठाकरे म्हणाले.

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४मुंबई दक्षिणआदित्य ठाकरेमतदानमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४