"अनेक डरपोक गद्दार झाले, पळून गेले; पण आमचा भाऊ सूरज..."; आदित्य ठाकरेंची खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 14:32 IST2025-02-04T14:26:58+5:302025-02-04T14:32:03+5:30
Aditya Thackeray Suraj Chavan : गेल्या वर्षभरापासून सूरज चव्हाण तुरुंगात होते, अखेर आज त्यांना जामीन मंजूर झाला

"अनेक डरपोक गद्दार झाले, पळून गेले; पण आमचा भाऊ सूरज..."; आदित्य ठाकरेंची खास पोस्ट
Aditya Thackeray Suraj Chavan : शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेनेचे नेते आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सूरज चव्हाण यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला. कथित खिचडी घोटाळा प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने सूरज चव्हाण यांना जामीन मंजूर केला. खिचडी घोटाळाप्रकरणी सूरज चव्हाण यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली होती. गेल्या वर्षभरापासून ते तुरुंगात होते, अखेर आज ते जेलमधून बाहेर आले. त्यांना जामीन मंजूर होताच आदित्य ठाकरे यांनी खास ट्विट पोस्ट करत त्यांचे कौतुक केले आणि शिंदेसेनेला टोला लगावला.
"अनेक डरपोक गद्दार झाले, पळून गेले. सर्व काही मिळूनही, चोरासारखे पळून गेले, कृतघ्न झाले. ज्या उद्धवजींनी भरभरुन दिलं, त्यांच्याच वडीलांचा फोटो, दिलेलं नाव चोरलं आणि आईसारख्या पक्षावर वार करुन निर्लज्जपणे मंत्रीपदं मिळवली, पापाचा अमाप पैसा साठवला. पण दुसऱ्या बाजूला मात्र, एक प्रामाणिक माणूस, आमचा लढणारा वाघ आणि भाऊ... सूरज!" असं ट्विट करत आदित्य ठाकरे यांनी सूरज चव्हाण यांचे कौतुक केले.
अनेक डरपोक गद्दार झाले, पळून गेले. सर्व काही मिळूनही, चोरासारखे पळून गेले, कृतघ्न झाले. ज्या उद्धवजींनी भरभरुन दिलं त्यांच्याच वडीलांचा फोटो, दिलेलं नाव चोरलं आणि आईसारख्या पक्षावर वार करुन निर्लज्जपणे मंत्रीपदं मिळवली, पापाचा अमाप पैसा साठवला.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 4, 2025
पण दुसऱ्या बाजूला मात्र, एक…
काय आहे प्रकरण?
१ लाख रुपयांच्या रोख मुचलक्यावर सूरज चव्हाण यांना जामीन मंजूर झाला. १७ जानेवारी २०२४ रोजी सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आली होती. लॉकडाऊनच्या काळात झालेल्या खिचडी घोटाळ्यात सूरज चव्हाण यांचं नाव समोर आलं होतं. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी याबाबत गंभीर आरोप केले होते. मुंबई मनपाला खिचडीचं कंत्राट पुरवताना पॅकेटमध्ये ठरल्यापेक्षा कमी खिचडी भरल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला.
कोविड काळात झालेल्या कथित खिचडी घोटाळाप्रकरणी आधी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं सूरज चव्हाण आणि अमोल किर्तिकर यांची चौकशी केली होती. त्यानंतर सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली. हा आदित्य ठाकरेंना मोठा धक्का मानला जात होता. कारण सूरज चव्हाण हे युवासेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी अत्यंत महत्वाचा दुवा राहिलेत. आदित्य ठाकरेंचे ते निकटवर्तीय मानले जातात. युवासेनेचा सामान्य कार्यकर्ता ते आदित्य ठाकरेंचा विश्वासू शिलेदार आणि पुढे जाऊन ठाकरे गटाचा सचिव असा सूरज चव्हाण यांचा राजकीय प्रवास राहिला आहे.