Join us  

मुंबईच्या रस्त्यावरून आदित्य ठाकरे कडाडले; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट आव्हान दिले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 4:44 PM

हा मुंबईकरांचा पैसा कंत्राटदारांच्या घशात घालण्याचा डाव आहे अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली.

मुंबई - शहरातील रस्ते कामांवरून युवासेना प्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. मुंबईतील क्रॉंक्रिट रस्त्याच्या कामात घोटाळा झाल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी करत थेट मुख्यमंत्र्यांना खुलं चॅलेंज दिले आहे. माझ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घ्यावी असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. 

मातोश्री येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबईतील रस्त्यांच्या रखडलेल्या कामात मुख्यमंत्री मिंदे सरकार जबाबदार आहे. महापालिकेच्या रस्ते कामासाठी खडी पुरवठादारांवर दबाव आणून एकाच कंपनीकडून खडी घेण्यास भाग पाडल्याची सध्या चर्चा आहे. यामुळेच खडीचे दर ५० टक्क्यांहून जास्त वाढले असून त्याचा परिणाम कामावर आणि आर्थिक स्थितीवर होणार आहे. ही कंपनी मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांची असल्याचा आरोप करत त्यांनी काही प्रश्न उभे विचारले. 

तसेच मुंबईमध्ये ४०० किमीचे रस्ते क्रॉंकिटचे काम सुरू केल्याचे केवळ सांगितलं जातेय. पण रस्त्याची आणि पुलांची कामे ठप्प आहेत. मुख्यमंत्र्यांना त्यांच्याजवळच्या कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डरचा फायदा करून देण्यासाठी सारे प्रयत्न सुरू आहेत का? असा सवाल करत पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरेंनी यांनी मुंबईमध्ये प्रस्तावित रस्त्यांच्या क्रॉंकिटीकरणावरून भ्रष्टाचाराचा आरोप केला. 

दरम्यान, मुंबईतील कॉंक्रिट रस्त्याचे कंत्राटं काढून तीन महिने झाले, पण अजूनही काम सुरू झालेलं नाही. राज्यात विकासाच्या नावावर केवळ घोटाळे सुरू आहे. हा मुंबईकरांचा पैसा कंत्राटदारांच्या घशात घालण्याचा डाव आहे अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली. घोषणा करताना सीसीटीव्ही लावले जातील. काम कुठं पर्यंत पोहचले त्याची माहिती लोकांना कळवली जाईल पण त्याचा देखील पत्ता नसल्याचा टोला आदित्य यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला. 

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या नियोजनाची चौकशी कराअप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणे ही चांगली गोष्ट आहे. परंतु सरकारने जे आयोजन केले. त्यातून निष्पापांचे बळी गेले. अजूनही सरकारकडून ठोस माहिती दिली जात नाही. २५ कोटी खर्च केलेत. कंत्राटदार कोण आहेत? व्हिआयपीसाठी शेड बांधले मग सामान्य भक्तांसाठी का नाही? पाण्याची सोय होती का? या सर्व बाबींची चौकशी होणे गरजेचे आहे. निधी खर्च कुठे आणि कसा झाला याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे. ज्या लोकांचे जीव गेले ते लपवण्यासारखे नाही. अजूनही आकडे स्पष्ट येत नाही. सखोल चौकशी झाली पाहिजे. ज्या कुणी निष्काळजीपणा केला आहे त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली. 

टॅग्स :आदित्य ठाकरेएकनाथ शिंदे