मुंबई - चक्रीवादळामुळे मुंबईत दिवसभर सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊस असल्याने महापालिकेने दहिसर, वांद्रे-कुर्ला संकुल आणि मुलुंड हे तीन जम्बो केंद्र पूर्ण रिकामे केले. येथील ५८० रुग्णांना स्थलांतरित केले. मात्र लवकरच पावसाळ्याला सुरुवात होणार असल्याने आता या जम्बो केंद्राच्या बांधकाम स्थैर्यतेची तपासणी दहा दिवसांमध्ये केली जाणार आहे. त्यानंतरच आवश्यक दुरुस्ती केल्यानंतर ही केंद्रे पुन्हा सुरू करण्यात येतील, अशी माहिती राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी दिली.
तौत्के या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी महापालिका मुख्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षास भेट देऊन मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे, संजीव जयस्वाल, पी.वेलरासू , सुरेश काकाणी आदी मान्यवर उपस्थित होते. या वादळी पावसात मुंबईत मोठ्या प्रमाणात झाडे कोसळली आहेत. याची स्वच्छता करून मुंबई तातडीने पूर्वपदावर आणण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.
या वादळासारखी परिस्थिती अलीकडच्या काळात मुंबईत पाहिली नाही. अनेक भागांमध्ये सोमवारी १६० मी.मी. पाऊस पडला आहे. मात्र वादळाचा इशारा मिळाल्यापासून पालिकेने केलेल्या नियोजनामुळे कोणतेही मोठे संकट ओढावले नाही. तसेच या काळात केंद्र आणि राज्य सरकारमध्ये योग्य समन्वय असल्याचे आदित्य ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच पाणी साचलेल्या ठिकाणांची माहिती घेऊन तिथे तत्काळ काही उपाययोजना कराव्या, अशी सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केली.
जम्बो केंद्रांचे ऑडिट....
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महापालिकेने बीकेसी कोविड केंद्रातील प्रतीक्षालय स्वतःच काढून ठेवले होते. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने या केंद्रातील २४३ कोविड रुग्णांना शनिवारी रात्री इतर रुग्णालयांमध्ये सुरक्षितपणे स्थलांतरित केले. तर या तीन जम्बो कोविड केंद्राच्या मजबुतीकरणासाठी येत्या दहा दिवसांत त्यांचे ऑडिट केले जाणार आहे.