मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षात शिवसेना विरुद्ध शिवसेना असाच सामना रंगलाय. शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात दैनिक लढाई सुरू आहे. त्यामुळेच, दररोज नवनवीन आरोप आणि आरोपावर प्रत्युत्तर अशा गोष्टी घडत आहेत. शिवसेना नेते आदित्य ठाकरे विरोधकांवर हल्लाबोल करायची एकही संधी सोडत नाहीत. तर, हे सरकार असंवैधानिक असल्याचंही ते सातत्याने म्हणतात. पुन्हा एकदा त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला असंवैधानिक सरकार म्हटलं आहे. तसेच, सध्याकाळ केवळ ठाकरे कुटुंबीयांसाठीच कसोटीचा नसून देशातील लोकशाहीसाठी घातक असल्याचंही त्यांनी म्हटलं.
मुंबईत लोकमत डिजिटल क्रिएटर अवॉर्ड 2023 सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात डिजिटल इन्फ्ल्युन्सर्सचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली. लोकमत मीडियाचे संपादकीय संचालक आणि सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा आणि मुंबई लोकमतचे संपादक अतुल कुलकर्णी यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.
राज्यात गेल्या ९ महिन्यांपासून काहीही निर्णय घेतले जात आहेत. घोटाळ्यांवर घोटाळे येत आहेत, आमचं नाव घेतलं जातंय, कुटुंबाचं नाव घेतलं जातंय, आमच्या आजोबांना चोरलं जातंय. सगळंकाही चोरलं जातंय. आम्ही कशाला तोंड देतोय, यापेक्षा सध्याचा काळ हा लोकशाहीचा मारक असल्याचाचा सर्वाधिक त्रास होतोय, असे आदित्य ठाकरेंनी या मुलाखतीत म्हटले. केवळ महाराष्ट्रातच नाही, संपूर्ण देशात असंच चाललंय. खोट्या केसेस, एजन्सीच आणि फेक अकाऊंटद्वारे ट्रोल केलं जातंय. देशात अघोषित हुकूमशाहीच सुरू असल्याचा आरोपही आदित्य ठाकरेंनी यावेळी केला.
त्यांनी स्वत:ला विकलंय
सुप्रीम कोर्टात गद्दार आमदारांचे निलंबन होणार असल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केला. शिंदे गट काहीतरी गडबड करणार, अशी माहिती अजित पवारांनी आधीच दिली होती का, यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, 'माझ्या वडिलांची सर्जरी झाली होती, तेव्हापासून यांच्या मनात मुख्यमंत्री बनण्याची किंवा सरकारमधून बाहेर पडण्याची खटपट सुरू होती. 20 मे रोजी उद्धव ठाकरेंनी विचारलं होतं की, तुमच्या मनात काय आहे? पण, तेव्हा त्यांनी काही सांगितलं नाही. ज्यांनी स्वतःला विकलंय, त्यांना थांबवून काय फायदा.'
माझं मुख्यमंत्र्यांना आव्हानंय
शिवसेनेचे आमदार म्हणायचे की, अजित पवार फक्त राष्ट्रवादीच्या आमदारांनाच फंड देतात? यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणतात, 'अजित पवारांनी सेशनमध्येच फंड दिल्याचा संपूर्ण लेखाजोखा मांडला होता. आमदारांना आमच्या काळात खूप फंड दिला. आता त्यांना विचारा, आता फंड नाही, आवाजही दाबला जातोय. हे सगळे आज ना उद्या निलंबित होणार. मी त्यांना आव्हान देतोय, राजीनामा द्या आणि निवडणूक लढा, जनता निर्णय घेईल. मी मुख्यमंत्र्यांनाही आव्हान दिलंय, वरळीतून लढा किंवा मी तुमच्या ठाण्यातून लढतो. पण, निवडणूक घेण्याची यांच्यात हिम्मत नाही,' अशी टीकाही आदित्य यांनी केली.