Aditya Thackeray: "कश्मिरी पंडितांसाठी महाराष्ट्राचे दरवाजे नेहमीच खुले, आता ठोस पाऊले उचलावे लागतील"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2022 01:08 PM2022-06-05T13:08:09+5:302022-06-05T13:09:06+5:30
राज्यसभा निवडणुका आम्ही जिंकूच, असा विश्वास पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
मुंबई - काश्मीर खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून कश्मिरी पंडित आणि हिंदूंचे ‘टार्गेट किलिंग’ सुरू आहे. महिनाभरात अनेक कश्मिरी पंडितांची हत्या करण्यात आली असून शेकडो भयभीत कश्मिरी पंडितांचे पलायन सुरू झाले आहे. अवघ्या देशात याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. तर, काश्मीर फाईल्स चित्रपटाचे दिग्दर्शक आणि भाजप नेत्यांवरही टिका होत आहे. आता, शिवसेनेनं कश्मिरी पंडितांवरील अन्यायाबाबत ठोस भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनंतर आता पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनीही यावर भाष्य केलं आहे.
राज्यसभा निवडणुका आम्ही जिंकूच, असा विश्वास पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. तसेच, निवडणुका येतात आणि जातात पण सध्या काश्मिरी पंडितांचा विषय महत्त्वाचा आहे. इतक्या वर्षानंतरही तेथील चित्र बदलले नाही. महाराष्ट्राचे दरवाजे काश्मिरी पंडितांसाठी नेहमीच खुले आहेत, असेही आदित्य ठाकरेंनी म्हटले. तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्दधव ठाकरेंनीही काश्मिरी पंडितांसाठी जे जे शक्य असेल ते महाराष्ट्र सरकार करेल, असे म्हटले आहे.
काश्मिरी पंडितांसाठी महाराष्ट्राचे दरवाजे नेहमीच खुले.
— Shivsena Communication (@ShivsenaComms) June 5, 2022
- शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, मंत्री आदित्य ठाकरे जी
https://t.co/TM7pTAIiX9 via @Saamanaonline
मुंबई हरित योद्धा या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आदित्य यांनी काश्मिरी पंडितांवर होत असलेल्या अन्यायावर भाष्य केलं. काश्मिरी पंडितांच्या जीवनावर आधारित काश्मीर फाईल्स या सिनेमाबद्दल किंवा त्याच्या कमाईबद्दल आपण बोलणार नाही. कारण, आता जाब विचारण्याऐवजी ठोस पाऊले उचलावी लागतील, असेही आदित्य यांनी म्हटले. दरम्यान, नियोजित दौऱ्यानुसार 15 जून रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामांचे दर्शन घ्यायला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
कश्मिरी पंडितांच्या पाठिशी महाराष्ट्र - मुख्यमंत्री
काश्मीर खोऱ्यात काश्मिरी पंडितांचे अक्षरश: शिरकाण सुरू आहे. त्यांना घरवापसीची स्वप्ने दाखविली गेली, पण घरवापसी तर दूरच उलट तेथील पंडितांना वेचून वेचून मारले जात आहे. या भयानक परिस्थितीत पंडितांचे मोठ्या प्रमाणावर पलायन सुरू झाले, ही धक्कादायक तितकीच अस्वस्थ करणारी घटना आहे. याक्षणी शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी इतकंच वचन देऊ शकतो की, या कठीण काळात काश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील.