मुंबई - शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे ४० आमदार आणि अपक्ष १० अशा एकूण ५० आमदारांनी एकत्र येत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर, महाविकास आघाडीतील नेत्यांनी या सर्व आमदारांवर प्रत्येकी ५० कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला होता. त्यावरुन, आता चांगलंच राजकारण तापलं आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबद्दल अपशब्द वापरल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले असून शिंदे गटानेही अब्रु नुकसानीची दावा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासंदर्भात शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केली.
पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांना पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. राऊत यांच्या जामीनावर आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली. त्याचवेळी त्यांना अब्रुनुकसानीच्या दाव्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावरही प्रतिक्रिया देताना त्यांनी नाव न घेता मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
चांगलंय अजून त्यांना खूप नोटीसा द्याव्या लागतील. बैलपोळ्यादिवशी दोन बैलांवर जे होतं, त्यांनाही नोटीस द्याव्या लागतील. आम्हाला सर्वांना खुशाल द्या, महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेला नोटीस द्या, ज्या ३३ देशांनी नोंद घेतली त्या देशांनाही नोटीस द्या, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाच्या अब्रु नुकसानीच्या दाव्यावर आपलं मत व्यक्त केलं. तसेच, दोन बैलं म्हणत मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला आहे. तसेच, ५० खोके एकदम ओक्के हे मी नाही म्हणत, महाराष्ट्राची जनता म्हणत आहे, आणि खोके कशाचेही असू शकतात. मग, यांना एवढं का लागलंय, असा सवालही आदित्य यांनी विचारला आहे.
जे नोटीस देणार म्हणतायंत त्यांना का झोंबलय एवढं, त्यांना काही मिळालंय का, त्यांना एखादं पद वगैरे देण्यात येणार आहे का, कुणाचा फोन आलाय का, गुवाहटीला जा म्हणून, याचेही स्पष्टीकरण त्यांनी द्यावं. मी नोटीसला नक्कीच उत्तर देईन, असे आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
तोफ पुन्हा मैदानात येतेय
संजय राऊत यांच्या जामीनाबाबत विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाले की, तोफ पुन्हा मैदानात येत आहे, संजय राऊत निष्ठावंत शिवसैनिक आहेतच, पण ते बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक आहेत. सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर दबावतंत्राचा वापर केला, पण त्यांनी पक्षाशी गद्दारी केली नाही. ते इतरांसारखे उगाचच नाव लावून फिरत नाहीत, मुखवटे लावून फिरत नाहीत,' अशी टीका आदित्य यांनी केली.