मुंबई - मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात अनेकांवर जोरदार टीका केली. बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. तसेच, भाजपासोबत युती करुन निवडणूक लढविणाऱ्या शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्यावरुनही राजगर्जना केली. राज ठाकरेंच्या भाषणात शिवसेना निशाण्यावर होती. यासंदर्भात पर्यटनमंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, मनसेला भाजपची सी टीएम असे म्हटलंय.
१९९९ मध्ये जेव्हा राष्ट्रवादीचा जन्म झाला तेव्हा जातीपातीचं राजकारण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सुरू झालं. यापूर्वी जात ही जातीचा अभिमान होता. परंतु,१९९९ मध्ये राष्ट्रवादीच्या जन्मानंतर त्यांनी जातीचा द्वेष करायला लावला," असं म्हणत राज ठाकरे यांनी टीका केली होती. राज ठाकरेंच्या टीकेला महाविकास आघाडीतील मंत्र्यांकडूनही मोठ्या प्रमाणात प्रत्युत्तर दिले जात आहे.
राज ठाकरेंचं भाषण भाजप पुरस्कृत असल्याची टिकाही यानिमित्ताने होत आहे. यासंदर्भात बोलताना आदित्य ठाकरेंनी मनसेला टाइमपास गोळी असं संबोधलं. तसेच, एमआयएम ही भाजपची बी टीम असून मनसे ही भाजपची सी टीम असल्याचा घणाघातही त्यांनी केला. तसेच, आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने मनसे आणि भाजपकडून अशाप्रकारे जातीय भेद निर्माण करुन राजकारण होत असल्याचंही ते म्हणाले. तसेच, आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनाच विजयी होईल. कारण, मुंबईतील जनतेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. तसेच, शिवसेनेनं केलेली कामे हेही त्याचं उदाहरण आहे. त्यामुळे, आगामी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेनं केलेली विकासाची कामे हेच आमचा चेहरा असणार असल्याचं आदित्य यांनी म्हटलं. आदित्य ठाकरे हे महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेचा चेहरा असतील का? या प्रश्नांवर त्यांनी एका मुलाखतीदरम्यान असं उत्तर दिलं. त्यात, उद्धव ठाकरे आणि विकास कामे ही दोन नावे त्यांनी घेतली.
वचन पूर्ण करणं हेही हिंदुत्त्व
भाजपाचं राजकारण पाहिलंत तर ज्या राज्यात सत्ता हवी आहे तिथे या दोन्ही पक्षांना वापरुन, एकमेकांविरोधात बोलून, काही घटना घडवून, हिंदू मुस्लिम दंगली घडवून सरकार स्थापन कसं करायचं याकडे लक्ष दिसत आहे, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसेच हिंदुत्वासाठी सतत लढण्याची गरज नसते. राजकीय पक्ष म्हणून जी वचनं देतो ती पूर्ण करणंही हिंदुत्व आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.