उमर खालिदसोबतच्या आंदोलनाबाबत आदित्य ठाकरेंचा मोठा खुलासा; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 10:23 AM2020-01-04T10:23:07+5:302020-01-04T12:31:42+5:30
छात्र परिषदेला दिल्लीचे छात्र नेते उमर खालिद, यूपीच्या युवा नेत्या रिचा सिंग, अलिगढ विद्यापीठ विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष सलमान इम्तियाज यांच्यासह गीतकार जावेद अख्तर राहणरा उपस्थित राहणार
मुंबई - नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीविरोधात रविवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या छात्र परिषदेतील आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीबाबत शिवसेनेने मोठा निर्णय घेतला आहे. आदित्य ठाकरे हे या छात्र परिषदेला उपस्थित राहणार नाहीत, असे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या संदर्भातील वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे. मात्र आदित्य ठाकरे हे जरी या परिषदेला अनुपस्थित राहणार असले तरी काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड आणि राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार हे मात्र छात्र परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्यावतीने मुंबईत होणाऱ्या छात्र परिषदेला आदित्य ठाकरे हे उपस्थित राहणार, अशी चर्चा होती. मात्र अशा कार्यक्रमाबाबत आपल्याला काही कल्पना नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्यावतीने ५ जानेवारीला मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA), राष्ट्रीय नोंदणी नागरिकत्व (NRC) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (NPR) विरोधी छात्र परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे देशभरात असंतोषाचे वातावरण आहे. जामिया, अलिगढ विद्यापीठातील आंदोलक विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण केली गेली. या काळ्या कायद्याचा विरोध होणे ही आजची महत्त्वाची मागणी असली पाहिजे. देशातील आदिवासी, मुस्लिम आणि भटक्या जमातींना देशातून हाकलून लावण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे.विद्यार्थ्यांनी हाती घेतलेले हे आंदोलन आता जन आंदोलन बनत चालले आहे. त्याचाच भाग म्हणून छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या पुढाकाराने परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला देशभरातून विद्यार्थी नेते उपस्थित राहणार आहेत.
मुंबईत सर्व समविचारी विद्यार्थी संघटनांचा या परिषदेत सहभागी असणार आहे. या परिषदेसाठी दिल्लीचे छात्र नेते उमर खालिद, यूपीच्या युवा नेत्या रिचा सिंग, अलिगढ विद्यापीठ विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष सलमान इम्तियाज, हरियाणाचे युवा नेते प्रदीप नरवाल, जेएनयुचे विद्यार्थी नेता रामा नागा, जामियाचे विद्यार्थी नेता हम्मादुररहमान, मुंबईच्या विद्यार्थी नेत्या सादिया शेख, टीस विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष भट्टा राम, छात्र भारतीचे राज्य अध्यक्ष प्रा. रविंद्र मेढे उपस्थित राहणार आहेत. तसेच गीतकार जावेद अख्तर, मंत्री वर्षा गायकवाड, आमदार कपिल पाटील, आमदार रोहित पवार, स्वागताध्यक्ष फारुक शेख यांना आंमत्रित केले आहे, अशी माहिती परिषदेचे निमंत्रक सचिन बनसोडे यांनी दिली आहे.