Join us

Aaditya Thackeray: पुण्यात येणारा मोठा प्रोजेक्ट गुजरातला, खोके सरकार म्हणत आदित्य ठाकरेंचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 4:05 PM

महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात अंतिम टप्प्यात आलेला सेमीकंडक्टरचा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी ट्विटमधून केला आहे.

मुंबई - महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेत असल्याचा आरोप अनेकदा भाजपवर करण्यात आला होता. परंतु आता माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करुन महाराष्ट्रातील पुण्यात येणारा मोठा प्रोजेक्ट गुजरातला जाणार असल्याची माहिती दिली. त्यासाठी, वेदांता ग्रुपला आणि गुजरातला शुभेच्छाही दिल्या आहेत. मात्र, महाराष्ट्रात होणारा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे शिंदे सरकावर संतापही व्यक्त केला आहे. खोके सरकार राजकारणात व घराघरात फिरण्यात व्यस्त असल्याची टिकाही आदित्य यांनी केली.

महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात अंतिम टप्प्यात आलेला सेमीकंडक्टरचा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी ट्विटमधून केला आहे. वेदांता-फॉक्सकॉननं आपला सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये सुरू करणार असल्याची घोषणा केली. वेदांता रिसोर्स लिमिटेडचे चेअरमन अनिल अग्रवाल यांच्या ट्वीटचा दाखला देत त्यांनी हा दावा केला.

हा प्रकल्प गुजरातला गेल्यानं आपल्याला धक्का बसल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. “भारतात सेमीकंडक्टर प्रकल्प भारतात सुरू होत असल्याचा आनंद आहे. परंतु हा प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेल्यानं धक्का बसला आहे. यापूर्वीचे फोटो ट्वीट करत हा प्रकल्प महाराष्ट्रात आणल्याचा दावा केला होता. परंतु त्यांचा हेतू/वचनबद्धता हा प्रकल्प महाराष्ट्रापासून दूर नेण्याची होती हे दिसते. हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुभाष देसाई, एमआयडीसी यांच्यासह मी बैठका घेतल्या होत्या. हा प्रकल्प महाराष्ट्रात सुरू करण्याबाबत सर्व अंतिम टप्प्यात आलं होतं,” असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं. त्यासोबतच शिंदे-फडणवीस सरकारवर टिकाही केली.

आपल्या देशात एवढा मोठा प्रोजेक्ट येणे, हे चांगलेच आहे. या प्रोजेक्टसाठी आम्ही गेल्या वर्षभरात अनेक बैठका घेऊन, भेटीगाठी करून पुण्याजवळ हा प्रोजेक्ट येईल, या हेतूने काम करत होतो, असेही त्यांनी सांगितले. 

  खोके सरकार राजकारणात व घराघरात फिरण्यात व्यस्त आहे. प्रशासनावर, कायदा सुव्यवस्थेवर कोणाचाच अंकुश नाही. खोके सरकारला माझी विनंती आहे, पिस्तुल काढणं, धक्काबुक्की करणं, गुंडगिरीची भाषा करणं सोडून द्या आणि अशा मोठ्या इंडस्ट्रीजना राज्यात आणावं जेणेकरून तरुण बेरोजगारांना रोजगार मिळेल, अशा शब्दात आदित्य यांनी सरकारच्या धोरणांवर आणि कामकाजावर टिका केली. 

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी वेदांता-फॉक्सकॉनच्या या प्रकल्पाला शुभेच्छाही दिल्या. तसंच विकासाचा नवा मार्ग निर्माण होईल असा विश्वास व्यक्त करत महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याला देशाच्या विकासात मोठं योगदान देणारं राज्य करण्याचे प्रयत्न केल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले. दरम्यान, अनिल अग्रवाल यांनी आपल्या ट्वीटमध्ये गुजरात सरकार आणि केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचेही आभार मानले. 

टॅग्स :आदित्य ठाकरेएकनाथ शिंदेपुणेव्यवसाय