Join us

संजय शिरसाटांच्या "त्या" विधानावर आदित्य ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 3:03 PM

कालची ठाण्यातील ती उत्तर भारतीयांची सभा नव्हती, तर ती एक बैठक होती. कोण ती प्रियंका चतुर्वेदी ती भाषण करत होती

मुंबई - शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी प्रियंका चतुर्वेदींच्या भाषणावर टीका करताना त्यांना शिवसेनेनं खासदार का केलं, याचं कारण सांगितलं. विशेष म्हणजे यावेळी, त्यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंचा दाखल देत, हे विधान त्यांनी केलं होतं, असेही ते म्हणाले. ठाणे येथील उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात प्रियंका चतुर्वेदी यांनी शिवसेनेतील फुटीर गटाला गद्दार म्हटलं होतं. त्यावरुन, शिरसाट यांनी प्रियंका चतुर्वैदींवर निशाणा साधला. त्यांचं सौंदर्य पाहून त्यांना खासदार केल्याचं शिरसाट यांनी म्हटलं होतं. आता, शिरसाट यांच्या विधानावर आदित्य ठाकरेंनी तीव्र शब्दात भावना व्यक्त केला आहेत. 

कालची ठाण्यातील ती उत्तर भारतीयांची सभा नव्हती, तर ती एक बैठक होती. कोण ती प्रियंका चतुर्वेदी ती भाषण करत होती. चतुर्वेदींबद्दल खैरेंनी काय म्हटले होते? आदित्य ठाकरेंनी तिचे सौंदर्य पाहून खासदार केलेय. संजय राऊत म्हणतात गद्दारांना उद्दवस्त करायचे तर आता उद्धव ठाकरे त्यांना उद्ध्वस्त करतील, अशी टीकाही आमदार शिरसाट यांनी केली. यासंदर्भात, महिला पत्रकाराकडून आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, अशा लोकांना जास्त महत्त्व देण्याची गरज नाही, तिसरा मंत्रिमंडळ विस्तार झाला तरी अद्यापही त्यांना कुणी महत्त्व दिलं नाही, असे म्हणत आदित्य यांनी शिरसाट यांच्या बोलण्याला गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे म्हटले. तसेच, ''गद्दार आमदारांना त्यांची किंमत कळली आहे. अशा सडक्या विचारांचे लोक राजकारणात टिकले कसे? हा प्रश्न पडतो. याचं दु:ख देखील होतं. पण, जनता त्यांना जागा दाखवेल.'' 

काँग्रेसकडे गेला होतात - शिरसाट

सत्तेची मजबुरी होती म्हणून तुम्ही काँग्रेसकडे गेलात हे तुम्ही काल सांगितले आहे. 2019 मध्ये शिवसेना भाजप युती म्हणून निवडणूक लढली आहे. स्वाभिमानी असाल तर त्यांनी राजीनामा द्यावा व जनतेच्या दरबारात जावे. दिघेंचा मृत्यू हा घातपाताने झाला आहे, हे सर्वांना माहिती आहे, ठाणेकरांनाही माहिती आहे. तुमच्या मांडीला मांडी लावून बसले तर तो पवित्र आणि तुमच्या विरोधात गेले की ते गद्दार कसे? उद्धव ठाकरे हे सध्या वैफल्यग्रस्त होऊन अशी विधाने करत आहेत, अशी टीका शिरसाट यांनी केली. 

आनंद दिघेंबद्दलही बोलले शिरसाट

दरवेळी पक्षातून लोक गेली की गद्दार गेले म्हणायची सवय आहे. परंतू, खऱ्या अर्थाने गद्दारी उद्धव ठाकरे यांनी केली. शिवसैनिकांना दाबण्याचे काम त्यांनी केले आहे. आनंद दिघेंच्या अंत्ययात्रेला उद्धव ठाकरे यांचा कुटुंबातील एकही जण का उपस्थित नव्हता? त्यांना माहीत होते अंत्ययात्रेला गेलो तर लोक दगड मारतील म्हणून ते गेले नाहीत. तुम्ही दहा शिवसैनिकांचे नाव सांगावे की ज्यांना तुम्ही उभे केले, असे आव्हान उद्धव ठाकरे यांना शिरसाट यांनी दिले.

टॅग्स :संजय शिरसाटआदित्य ठाकरेशिवसेनाउद्धव ठाकरे