मुंबई - आज आटोपलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधाकांनी आक्रमक भूमिका घेत सत्ताधारी महाविकास आघाडीवर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. या सर्व आरोपांना तसेच केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाराष्ट्रातील मंत्री, महाविकास आघाडीमधील नेते, शिवसैनिक आणि नातेवाईकांवर होत असलेल्या कारवायांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळातून सडेतोड समाचार घेतला. तसेच सत्तेसाठी धाडी टाकू नका. मी तुमच्यासोबत येतो, मला तुरुंगात टाका, असे थेट आव्हानही त्यांनी विरोधी पक्ष असलेल्या भाजपाला दिले, मुख्यमंत्र्यांच्या या घणाघाती भाषणानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी एक मोठं विधान केलं आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, सध्या देशात अघोषित आणीबाणीसारखी परिस्थिती आहे. या सर्व परिस्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परखडपणे मत मांडलं. विरोधकांना आरोप करण्याची सवयच आहे. सकाळपासून ते आरोपांना सुरुवात करतात. मात्र विरोधकांच्या सर्व आरोपांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिरफाड केली आहे. तसेच महाराष्ट्र हा कधीही झुकणार नाही, असेही आदित्य ठाकरे यांनी ठामपणे सांगितले.
दरम्यान, विरोधकांकडून होत असलेले गंभीर आरोप, केंद्रीय यंत्रणांवर होत असलेल्या कारवाया, शिवसैनिक आणि नातेवाईकांवर होणारे आरोप या सर्वांना उद्धव ठाकरे यांनी चोख प्रत्युत्तर दिले. महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. ही इडी आहे की घरगडी आहे, तेच कळत नाही. सत्तेसाठी धाडी टाकू नका. मी तुमच्यासोबत येतो, मला तुरुंगात टाका. तसेच सकाळच्या सत्तेचा प्रयोग यशस्वी झाला असता तर तुम्ही मलिक, देशमुखांच्या शेजारी मांडीला मांडी लावून बसला असता, असा चिमटाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काढला.