Join us  

"कितीही चिखल असला तरी वरळीत कमळ फुलू देणार नाही’’, आदित्य ठाकरेंचं भाजपाला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 3:20 PM

Aditya Thackeray News: आदित्य ठाकरे प्रतिनिधित्व करत असलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाला अगदीच किरकोळ आघाडी मिळाली होती. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत येथे आदित्य ठाकरेंना धक्का देण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी भाजपाला आव्हान दिलं आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील नेत्यांना आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. तसेच लोकसभा निवडणुकीतील निकालांच्या आधारावर सर्वच पक्षांकडून विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी केली जात आहे. दरम्यान, मुंबईमध्ये महाविकास आघाडीने सहा पैकी ४ जागा जिंकल्या असल्या तरी आदित्य ठाकरे प्रतिनिधित्व करत असलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाला अगदीच किरकोळ आघाडी मिळाली होती. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत येथे आदित्य ठाकरेंना धक्का देण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी भाजपाला आव्हान दिलं आहे. वरळीत कितीही चिखल झाला असला तरी भाजपाला कमळ फुलवू देणार नाही, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

वरळी विधानसभा मतदारसंघातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आपल्याला आठवत असेल की, मी जेव्हा निवडणूक लढवत होतो, तेव्हा सांगितलं होतं की, सगळेच ही जागा कशी आहे हे बघायला येतील. वरळीत ए प्लस होत असताना सगळीकडून लोकं येताहेत, सगळ्यांच स्वागत करतोय. काही मोठ्या लोकांनी रोड शो देखील करावा, ही सुद्धा मी विनंती करत आहे, असा चिमटादेखील आदित्य ठाकरे यांनी काढला.

यावेळी वरळीतील जांभोरी मैदानात चिखल झाला आहे, त्याबाबत विचारलं असता कितीही चिखल असला तरीही येथे कमळ येऊ देणार नाही, असं विधान आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. वरळी विधानसभा मतदारसंघाचा समावेश असलेल्या मुंबई दक्षिण मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. मात्र वरळीमधून त्यांना अपेक्षित आघाडी मिळू शकलेली नाही. त्यामुळे ठाकरे गटाची चिंता वाढलेली आहे. 

टॅग्स :आदित्य ठाकरेवरळीशिवसेनाभाजपा