Join us

आदित्य ठाकरेंच्या विश्वासू शिलेदाराचा राजीनामा; युवासेनेला अखेरचा जय महाराष्ट्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 7:48 PM

मी राजकारणात तुमच्यामुळेच आलो. तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलात. मला युवासेनेच्या माध्यमातून संधी दिली असं पत्रात म्हटलं आहे.

मुंबई - आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून आदित्य ठाकरे यांच्या विश्वासू सहकाऱ्याने पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. युवासेनेचे पदाधिकारी आणि मुंबई महापालिकेतील नगरसेवक अमेय घोले यांनी आदित्य ठाकरेंना पत्र पाठवून जड अंत:करणाने मला युवासेना सोडण्याचा निर्णय घ्यावा लागतोय असं म्हटलं आहे. 

अमेय घोले यांनी पत्रात म्हटलंय की, मी राजकारणात तुमच्यामुळेच आलो. तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलात. मला युवासेनेच्या माध्यमातून संधी दिली. तुम्ही दिलेली प्रत्येक जबाबदारी मी गेले १३ वर्षापासून अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली. परंतु वडाळा विधानसभा मतदारसंघात काम करताना महिला संघटक श्रद्धा जाधव आणि शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांनी माझ्या कामात वारंवार अडथळे आणण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मला काम करताना खूप त्रास आणि मनस्ताप झाला. 

तसेच मी आपल्याला वेळोवेळी माहिती दिली होती. संघटनेतील काही मतभेद दूर व्हावे आणि मला सुरळीतपणे माझे काम सुरू ठेवता यावे यासाठी मी खूप प्रयत्न केला. परंतु काही कारणास्तव यावर काहीच मार्ग काढला गेला नाही. त्यामुळे मी अखेरीस जड अंत:करणाने युवासेना सोडण्याचा निर्णय घेत आहे. आज मी माझ्या युवासेनेच्या कोषाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे हे सांगताना मला अत्यंत दु:ख होत आहे असंही अमेय घोले यांनी पत्रात म्हटलं. दरम्यान, जी आपली मैत्री ही केवळ राजकारणापुरती नाही. तुमच्या बरोबरचा संघटनेतील माझा प्रवास थांबवत असलो तरी आपली मैत्री कायम राहावी हीच अपेक्षा व्यक्त करतो असंही पत्रात पुढे विनंती करण्यात आली आहे. 

अमेय घोले पक्षात होते नाराजआदित्य ठाकरेंचे विश्वासू आणि युवासेनेचे पदाधिकारी अमेय घोले गेले अनेक दिवस नाराज असल्याची चर्चा होती. युवासेनेतील नियुक्त्यांमध्ये विश्वासात घेतले जात नाही. परस्पर नेमणुका केल्या जातात अशी नाराजी त्यांनी जाहीर व्यक्त केली होती. अमेय घोले म्हणाले होते की, आमच्या मनातील शिवसेना, हक्काची युवासेना, बाळासाहेब ठाकरेंचे कुटुंब मनातून, ह्दयातून कुणी काढू शकत नाही. आम्ही नेहमी हिंतचिंतक होतो आणि राहणार. युवासेना बाळाप्रमाणे मोठी केलीय. पण आम्ही जे स्वप्न पाहिले होते ते कुठेतरी विना अडथळा पूर्ण व्हावा ही आमची अपेक्षा होती. काही महिन्यांपासून काहीजण युवासेनेत स्वत:चं वर्चस्व निर्माण केलंय. त्याबाबत आदित्य ठाकरेंना आम्ही सांगितले.

नेहमीच फिडबॅक देतो. परंतु त्यात मोडतोड करून दुसऱ्याने सुचवलेले प्लॅन प्रत्यक्षात उतरवण्याचं काम सुरू आहे. हक्काच्या युवासेनेसाठी दिवसरात्र झटकतायेत त्यात अडथळा निर्माण करणे, स्वत:चा एककलमी कार्यक्रम करणं या गोष्टीचा त्रास होतोय. गेल्या एक दिड वर्षापासून हा प्रकार सुरू आहे. मी ज्या भागात नगरसेवक आहे त्याठिकाणी परस्पर नियुक्त्या करण्यात आल्या असा आरोप अमेय घोले यांनी केला होता.  

टॅग्स :आदित्य ठाकरेशिवसेना