लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या रस्त्यांच्या कामांबाबतच्या प्रश्नांवर मुंबई महापालिकेकडून नियमानुसारच निविदा काढल्याचे उत्तर देण्यात आले. मात्र, या स्पष्टीकरणावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिप्रश्न उपस्थित केले आहेत. कोणत्या नगरसेवकांकडून कामे सुचविण्यात आली आणि ही कंत्राटे शिंदे गटाच्या फायद्यासाठी तर देण्यात आली नाहीत ना, यासह अनेक नवे प्रश्न उपस्थित करत मला बोलावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण द्यावे, असे आवाहनही केले आहे.
आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी पुन्हा महापालिकेला पत्र लिहून रस्त्यांचे कंत्राट व्यावहारिक आहे का?, यात मोठा घोटाळा तर नाही ना? त्याचबरोबर गद्दारांच्या टोळीसाठी हे सेटिंग केले आहे का, या प्रश्नांची उत्तरे न मिळाल्याचे नमूद करताना नवे प्रश्न उपस्थित केले.
कोणत्या नगरसेवकांनी रस्त्यांची कामे सुचवली?
- कंत्राटदारांनी एसओआरपेक्षा सरासरी ८ टक्के जास्त बोली का आणि कशी लावली ?
- स्वतंत्रपणे जीएसटी लावण्याची पद्धत नसताना कंत्राटदारांना ६६ टक्के वाढीव देयके देऊन वेगळा जीएसटी का लावण्यात आला?
- निविदेसाठी फक्त ५ बोलीदारांनीच अर्ज कसा केला?
- कोणत्या नगरसेवकांनी रस्त्यांची कामे सुचवली त्यांची विनंती पत्रे पाहता येतील का?
- कंत्राटदारांनी मुंबई सोडून इतर शहरात कुठे आणि कोणत्या दराने काम केले आहे? अन्य कोणत्या शहरात सगळे रस्ते काँक्रीटचे आहेत?
- काँक्रीटचे काम ३२ महिन्यांपर्यंत चालत असताना २४ महिन्यांचा कामाचा कालावधी कसा धरण्यात आला?