महिलेचा छळ करणाऱ्या शाखाप्रमुखाला आदित्य ठाकरेंचं छुपं समर्थन; नितेश राणेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 11:02 PM2024-04-06T23:02:05+5:302024-04-06T23:02:20+5:30
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरीत नितेश राणेंनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यात भाजपा आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहे. महिलेचा छळ करण्याचा आरोप असलेल्या शाखाप्रमुखाला आदित्य ठाकरे भेटतात, याचा अर्थ त्यांचे छुपं समर्थन आहे का असा सवाल नितेश राणेंनी केला आहे.
नितेश राणे म्हणाले की, उबाठा गटाच्या शाखाप्रमुखावर मालमत्तेसाठी लग्नाचं खोटं आमिष दाखवून तिच्यावर छळ करण्याचा आरोप आहे. पोलिसांनी त्याच्यावर एफआयआरही केला आहे. तो कालच जामिनावर बाहेर आलेला आहे. अशा महाभागाला स्वत: आदित्य ठाकरे भेटतात. या व्यक्तीने महिलेचा जो छळ, अत्याचार केलाय या सगळ्या गोष्टीला आदित्य ठाकरेंचं छुपं समर्थन आहे का असा सवाल त्यांनी विचारला आहे.
राणे-ठाकरेंमध्ये आरोप प्रत्यारोप
कोरोनाच्या काळात महानगरपालिकेने पैसे दिले. पण त्यातही यांनी पैसे खाल्ले. बाप-बेटे लवकरच तुरुंगात जाणार, अशी टीका भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता केली. तसेच यांचीच यंत्रणा असते असे नाही. राणे यंत्रणाही कार्यरत असते. सीआयडी, ईडी वेगळे आहेत, माझी एक स्वतंत्र यंत्रणा आहे. अनेक जण कुठे जातात, कुठे फुटतात, कुठे उतरतात, फार बारकाईने माहिती असते, असे नारायण राणे म्हणाले होते.
त्यावर दोन महिन्यांनी देशात आमची सत्ता येणार आहे. त्यामुळे दोन महिन्यांनी ते कुठे असतील, ईडी आणि सीबीआयच्या त्यांच्या ज्या फाइल्स बंद केल्या आहेत, त्या पुन्हा उघडल्या तर ते कुठे असतील, ते तिहार जेलमध्ये जातील, असा पलटवार संजय राऊत यांनी केला होता.